स्थान: नागपूर
*नोडल अधिकाऱ्यांनी समन्वयाने जबाबदारींचे निर्वाह करावे*
-नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक
नागपूर दि १५: नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी समन्वयाने नियोजनबद्ध व कालमर्यादेत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात श्री. कुमार आशीर्वाद यांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रचना इंदुरकर, उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार ) इंदिरा चौधरी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मलिक विराणी, उपजिल्हाधिकारी गणेश मारकड, उपजिल्हाधिकारी अमोल कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दौंड यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील नायब तहसीलदार व तलाठी दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.
निवडणूक कार्यक्रमानुसार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. त्यादृष्टीने निवडणुकीसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी व वाटप जबाबदारीने व वेळेत करण्यात यावे. याबाबत उद्या नियोजन भवन येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप करण्यासाठी टेबल संख्या निश्चित करून त्यानुसार कार्यवाही करावी. यासाठी कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश निर्गमित करावे. मतपत्रिका व मतपेटी सुस्थितीत असल्याची खात्री करावी. मतदानासाठी लागणारे विशेष पेन तसेच इतर आवश्यक साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावे. मतदार यादी अचूक असावी. मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या तात्काळ वाटप करण्यात याव्या. टपाली मतपत्रिका वितरित करण्याची प्रक्रिया जबाबदारीने पार पाडावी. टपाली मतपत्रिकांचे संकलन योग्य पद्धतीने करून प्राप्त होणाऱ्या मतपत्रिकांचा अहवाल अद्ययावत ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले दिले.
यादरम्यान वाहतूक व्यवस्थेचे नियोजन काटेकोर असावे. तसेच वाहन अधिग्रहण, व्यवस्थापन व आराखडा अचूक असावा. नागपूर जिल्ह्यातील संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना मागणीप्रमाणे वाहने उपलब्ध करून देण्याच्या व्यवस्थेसह प्रत्येक मतदान केंद्रासाठी आवश्यक वाहने आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात यावे. याकामी तहसीलदार व तलाठी यांना जबाबदारी देण्यात यावी असे श्री आशीर्वाद यांनी सांगितले.
स्ट्रॉंग रूमच्या कामांबाबतचे अंदाजपत्रक त्वरित सादर करून कामास तात्काळ सुरुवात करावी. निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी नियोजित आहे. त्यादृष्टीने ही कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना केल्या. निवडणुकीच्या कोणत्याही कामात कसूर न करता संबंधित यंत्रणेने अचूक व वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
*******















