स्थान: Maharashtra
वार्ताहर: साहिल येरने
महाराष्ट्रामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच ‘एसआयआर’ (Special Intensive Revision) प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून नावे वगळण्यावर (Deletions) तातडीची अंतरिम स्थगिती देण्यास बॉम्बे उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात या व्यापक मुद्द्यावर आधीच महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असल्याने, उच्च न्यायालयात समांतर सुनावणी घेणे उचित ठरणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी तीन आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत एम. सेथना यांच्या खंडपीठासमोर या संदर्भातील जनहित याचिकेवर सविस्तर सुनावणी पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे (व्हीबीए) युवा प्रदेशाध्यक्ष सागर रमेश गवई आणि रफीक इलाही खान यांनी ॲडव्होकेट हितेंद्र गांधी यांच्यामार्फत ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ नेते आणि विधिज्ञ ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली, तर केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे ज्येष्ठ ॲडव्होकेट आशुतोष कुंभकोणी यांनी युक्तिवाद केला. याचिकेत निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येत असलेल्या घरोघरी पडताळणी मोहिमेतील (Door-to-door enumeration) गंभीर त्रुटींवर बोट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्ष पडताळणीदरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) विहित नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आणि नागरिकांकडे अनावश्यक कागदपत्रांची सक्ती करत असल्याचा मुख्य आक्षेप नोंदवण्यात आला. तसेच मतदारांची कोणतीही शहानिशा न करता त्यांना परस्पर गैरहजर (Absent), स्थलांतरित (Shifted), मृत (Deceased) अथवा दुबार (Duplicate) वर्गात टाकून लाखो मतदारांची नावे मतदार यादीतून मनमानी पद्धतीने वगळली जात असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याकडून (ERO) रीतसर नोटीस बजावणे, मतदाराला आपली बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी देणे आणि सविस्तर लेखी आदेश (Speaking Order) जारी करणे या कायदेशीर प्रक्रियेशिवाय कोणाचेही नाव वगळले जाऊ नये, अशी मागणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित, दुर्बल आणि स्थलांतरित घटकातील पात्र नागरिकांचा मतदानाचा घटनादत्त अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी या प्रक्रियेला तातडीने अंतरिम स्थगिती द्यावी, असा आग्रह त्यांनी खंडपीठासमोर धरला. याचिकाकर्त्यांच्या या मागणीला केंद्रीय निवडणूक आयोगाचे वकील आशुतोष कुंभकोणी यांनी जोरदार विरोध दर्शवला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, मतदार पडताळणी आणि एसआयआर प्रक्रियेशी संबंधित मूळ याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ८ ऑक्टोबर रोजी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या प्रकरणांवर देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये एकाच वेळी समांतर न्यायालयीन प्रक्रिया (Parallel proceedings) चालवू नये, अशी स्पष्ट अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणात कोणताही अंतरिम आदेश देणे योग्य होणार नाही, असा युक्तिवाद आयोगातर्फे करण्यात आला. यावर प्रत्युत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा संदर्भ बिहारपुरता मर्यादित असल्याचे सांगत महाराष्ट्रातील परिस्थिती भिन्न असल्याचा दावा केला, मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद स्वीकारला नाही. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांच्या खंडपीठाने न्यायालयीन औचित्याचा (Judicial Propriety) दाखला दिला. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात जेव्हा एखाद्या धोरणात्मक आणि व्यापक विषयावर सुनावणी सुरू असते, तेव्हा उच्च न्यायालयाने त्यावर समांतर सुनावणी घेणे अथवा अंतरिम स्थगिती देणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचा आदर राखत खंडपीठाने मतदार यादीतून नावे वगळण्याच्या प्रक्रियेवर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला आणि प्रकरणाची सुनावणी तीन आठवड्यांनंतर घेण्याचे निश्चित केले. महाराष्ट्रात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम अत्यंत महत्त्वाची आणि वादग्रस्त ठरली आहे. मतदार याद्यांचे शुद्धीकरण करणे, बोगस नोंदी काढणे आणि पारदर्शकता आणणे हे आयोगाचे उद्दिष्ट असले तरी राजकीय पक्ष आणि नागरी संघटनांनी या मोहिमेच्या अंमलबजावणीवर तीव्र शंका उपस्थित केल्या आहेत. घरोघरी जाऊन कागदपत्रे तपासताना अनेक सामान्य मतदारांची नावे वगळली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती नाकारल्यामुळे तूर्तास निवडणूक आयोगाची ही मोहीम सुरूच राहणार असून आता सर्वांचे लक्ष ८ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे आणि त्यानंतर तीन आठवड्यांनी उच्च न्यायालयात होणाऱ्या निर्णयाकडे लागले आहे.














