info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  15 Sep 2023

पत्रकारितेत खाजगी व सामाजिक आयुष्याचा त्याग असतो-पांडे


-स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा 

नागपूर, दि. 15 -समाजाचा आवाज मांडायची संधी पत्रकारितेने दिली. हा व्यवसाय  विचित्र आहे. यात पत्रकारांना खाजगी आणि सामाजिक आयुष्याचा त्याग करावा लागतो. या त्यागाची समाजाला जाणीव नाही, अशी खंत माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी व्यक्त केली.

विदर्भ गौरव प्रतिष्ठान व नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने ‘स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार २०२२’  वितरण सोहळा प्रेस क्लबच्या सभागृहात  पार पडला. यावेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे  महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलपती प्रो. एल. कारूण्यकरा, पत्रकार अशोक वानखेडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष  गिरीश गांधी, प्रसिद्ध विधिज्ञ फिरदोस मिर्झा, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र उपस्थित होते.

नवभारतचे ज्येष्ठ संपादक संजय तिवारी , सकाळचे सहयोगी संपादक प्रमोद काळबांडे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.  सन्मानचिन्ह आणि २१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रो. एल. कारूण्यकरा म्हणाले, देशात स्वतंत्र पत्रकारितेची दीर्घ परंपरा आहे. राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेत पत्रकारिता महत्त्वाची आहे. पत्रकारितेने समाजात अनेक बदल घडविले आहेत. 
 गिरीश गांधी म्हणाले, पत्रकारांनी विषय हाताळताना पत्रकारितेचा दर्जा कायम ठेवावा. ज्या क्षेत्रात काम केले त्याचे महत्त्व आपण राखायला हवे. सजग राहून पत्रकारिता करण्याचा त्यांनी सल्ला  दिला.

अशोक वानखेडे म्हणाले, कार्यकर्ता हा पत्रकार होतो. तेव्हा समाजात बदल घडून येतो. समाजात अनेक समस्या आहेत. उद्‍बबोधन हे पत्रकारांचे काम नाही. वास्तव मांडणे हे त्यांचे काम आहे. त्यासाठी पत्रकारिता करणे आज गरजेचे आहे. संजय तिवारी व प्रमोद काळबांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागतपर भाषण प्रदीप मैत्र यांनी, प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी, सूत्रसंचालन शुभदा फडणवीस यांनी केले. आभार विधिज्ञ फिरदोस मिर्झा यांनी मानले.  
कार्यक्रमाला कार्यकारी संपादक संदीप भारंबे, अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव, बाळ कुलकर्णी, प्रतिष्ठानचे नीलेश खांडेकर, प्रेम लुणावत, रूपाली मोरे, माजी नगरसेविका प्रगती पाटील  उपस्थित होत्या. 
......................


विदर्भ गौरव प्रतिष्ठान व नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार सोहळ्यात मंचावर   प्रदीप मैत्र, डॉ. गिरीश गांधी, अशोक वानखेडे, राहुल पांडे, कुलपती प्रा. एल. कारूण्यकरा,  आणि ॲड. फिरदोस मिर्झा.