info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  24 Jun 2023

' चला जाणूया नदीला अभियान '*-जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्र सिंह यांच्यासोबत चर्चा*

*नागपूर,दि.२4- नद्यांच्या संवर्धन व संरक्षणासाठी प्रशासन कटीबद्ध असून ‘चला जाणूया नदीला’ हे  राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान नागपूर विभागात यशस्वी करण्यात येईल, असे आश्वासन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी जलतज्ज्ञ तथा ‘चला जाणूया नदीला’ अभियानाच्या अंमलबजावणीकरिता गठीत समितीचे विशेष निमंत्रित डॉ.राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले. 

डॉ.राजेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने  विभागीय आयुक्त कार्यालयात श्रीमती बिदरी यांची भेट घेतली व चर्चा केली. या शिष्टमंडळात ‘चला जाणूया नदीला’ अभियानाचे नियोजन आणि अमंलबजावणीसाठी गठीत समितीचे अशासकीय सदस्य सर्वश्री नरेंद्र चूग, डॉ.सुमंत पांडे, डॉ.प्रविण महाजन, रमाकांत कुलकर्णी आदींचा समावेश होता.

    या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात नागपूर विभागात झालेल्या अंमलबजावणीच्या सद्यस्थितीची माहिती श्रीमती बिदरी यांना देण्यात आली. विभागातील गडचिरोली, भंडारा, वर्धा जिल्ह्यांमध्ये उत्तम कार्य झाल्याचे शिष्टमंडळाच्यावतीने सांगण्यात आले. चला जाणूया नदीला अभियानांतर्गत लोकसहभाग आणि प्रशासनाच्या मदतीने नागपुरातून वाहणाऱ्या नाग आणि आम नद्यांच्या सद्यस्थितीची माहिती यावेळी देण्यात आली. नागपूर जिल्हा प्रशासन व महानगर पालिका प्रशासनाला आवश्यक सूचना देवून हे अभियान यशस्वी करण्यात येईल,असे श्रीमती बिदरी यांनी सांगितले.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन याबरोबरच जलसंधारण आणि जलसाक्षरतेची सांगड घालत राज्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील ७५ नद्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत नद्यांच्या परिक्रमेचे आयोजन  करण्यात येत आहे. यामाध्यमातुन नदी व त्यांचे आरोग्य जाणून घेण्यात येत आहे. तसेच नद्यांवरील अतिक्रमण, अस्वच्छते सारख्या समस्या दुर करण्यात येत आहेत.