info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  22 Aug 2023

लवकरच जपानसाठी अधिकची उड्डाणे : देवेंद्र फडणवीस*

*जपानमध्ये भारताचा तिरंगा आणि मराठीचा झेंडा!*

-क्योटोतील बुध्द टेम्पलला भेट

*टोकियो/क्योटो, 21 ऑगस्ट*
जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरुन 5 दिवसांच्या दौर्‍यावर गेलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज टोकियो येथे आगमन झाले.तेव्हा  मराठी बांधवांनी ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘जय महाराष्ट्र’ असे नारे देत, पारंपारिक मराठी वेषात त्यांचे स्वागत केले. जणू जपानमध्ये महाराष्ट्र साकारला होता.

मराठी बांधवांच्या स्वागतानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी छोटेखानी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, तुमच्या स्वागतामुळे जपानमध्ये नाही तर मी मुंबई किंवा पुण्यात आलो, असे मला वाटते आहे. तुम्ही सर्वांनी मराठी भाषा, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा गौरव हा सातासमुद्रापलिकडे जिवंत ठेवला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे, त्यामुळे जपानमध्ये शिवजयंतीसाठी सर्वतोपरी मदत महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या मराठी बांधवांना आश्वस्त केले. यावेळी उपस्थितांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, 2022 पासून जपानमध्ये आम्ही शिवजयंती साजरी करीत आहोत. यात जपान सरकारचे योगदान आहे आणि आता तर पालखी काढण्यासाठी सुद्धा परवानगी देण्यात आली आहे.

आज पहिल्या दिवशी टोकियोतील इंडिया हाऊसमध्ये प्रामुख्याने जी चर्चा झाली, त्यात अधिकाधिक जपानी कंपन्यांना महाराष्ट्रात आणणे, मराठी विद्यार्थ्यांना जपानमध्ये अधिक शैक्षणिक संधी आणि जपानमधील मराठी उद्योजकांच्या विकासासाठी पाऊले उचलणे, इत्यादी बाबतीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. टोकियो विमानतळावर आगमन होताच जपानमधील भारताचे राजदूत सिबी जॉर्ज यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. त्यानंतर शिकान्सेन बुलेट ट्रेनने देवेंद्र फडणवीस यांनी क्योटोपर्यंतचा प्रवास केला. याठिकाणी उल्लेखनीय बाब म्हणजे टोकियो ही जपानची विद्यमान राजधानी आहे, तर क्योटो ही प्राचीन राजधानीचे शहर आहे.

क्योटो येथे कौन्सुल जनरल निखिलेश गिरी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. वाकायामा प्रिफेक्चरचे आंतरराष्ट्रीय कामकाज संचालक योशियो यामाशिता तसेच ‘असोशिएशन ऑफ फ्रेंडस ऑफ जपान’चे अध्यक्ष समीर खाले तसेच इतर प्रतिनिधी सुद्धा यावेळी उपस्थित होते. क्योटो येथे देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आघाडीच्या उद्योजकांच्या भेटी घेतल्या. हे सर्व उद्योजक क्योटो, ओसाका आणि कांसाई क्षेत्रातील आहेत. यात सुरेश लाल, राम कलानी, भावेन जव्हेरी, गुरमित सिंग, श्यामसिंग राजपुरोहित, सत्येन बंडोपाध्याय, शितोरु रॉय, सुरेश नरसिंहन, माकी केईजी, मोहन गुलराजानी, दीपक दातवानी, अजयकुमार नामा, अमित त्यागी, मानवेंद्र सिंग, चैतन्य भंडारे तसेच समीर खाले इत्यादींचा समावेश होता.

या उद्योजकांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज पहिल्याच दिवशी मला जपानची सांस्कृतिक राजधानी असलेल्या क्योटोला भेट देण्याची संधी मिळाली. गेल्या 9 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत आणि जपान संबंध नव्या उंचीवर गेले आहेत. जपानच्या उद्योजकांना महाराष्ट्रात अनेक उत्तम संधी आहेत. आज महाराष्ट्र हे परकीय गुंतवणूक आकर्षित करणारे क्रमांक 1 चे शहर आहे. महाराष्ट्र आणि वाकायामा या दोन प्रांतात तर अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. येणार्‍या काळात नवी मुंबई विमानतळ सुरु होते आहे, त्यामुळे जपानसाठी आणखी उड्डाणे सुरु करण्यास मदत होईल. जपानची आर्थिक राजधानी असलेल्या ओसाका येथील भारतीयांना त्यामुळे मोठी मदत मिळेल.

देवेंद्र फडणवीस यांनी आज क्योटो येथे किंकाकूजी झेन बुद्धीस्ट टेम्पलमध्ये (गोल्डन पॅव्हेलियन) दर्शन घेतले. हे जागतिक वारसा स्थळ असून उत्तम कलाकृतीचा नमुना आहे.