कॉंग्रेसनै केला महायूतीचा मार्ग सोपा
कॉंग्रेसने केला महायुतीचा मार्ग सोपा
-मोरगाव/अर्जुनीत बाहेरचा उमेदवार..!
प्रतिनिधी
गोंदिया, दि.26- मोरगाव/अर्जुनी विधानसभेची निवडणूक विविध घडामोडींनी गाजली. विद्यमान आ.मनोहर चंद्रिकापूरे यांचे तिकिट कापले. ते राष्ट्रवादी आणि भाजपच्या सर्वेत पिछाडीवर राहिले. ती पिछाडी भोवली. ही जागा राष्ट्रवादीला सुटली. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई केली.पक्ष तुमचा उमेदवार आमचा हा फार्मूला दिला. तो महायुतीला पटला. हा फार्मूला हिट झाला. प्रचाराला डबल इंजिन लागल्याने महायुतीचा माहौल सुरू झाला.
माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा 2019 च्या निवडणुकीत निसटता पराभव झाला. ही पराभवाची सल भाजप कार्यकर्त्यामध्ये होती. तेव्हापासूनच कार्यकर्त्यांनी बडोले यांना 2024 मध्ये निवडूण आणण्याचा निर्धार केला होता. शेवटपर्यंत भाजपने या जागेचा आग्रह धरला. शेवटी मधला मार्ग स्वीकारला. आता ही जागा प्रफुल्ल पटेल आणि फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली. परिणामी प्रचारात राकॉ-भाजपचे डबल इंजिन कामास लागले. ही खेळी हिट झाली. योगायोगाने कॉग्रेसने या ठिकाणी दिलिप बन्सोड यांना उमेदवारी दिली. बन्सोड तिरोड्याचे आहेत. या नवख्या मतदार संघात अजिबात संपर्क नाही. बन्सोड यांचे पार्सल परत पाठवा. या घोषणा सुरू झाल्या.
दुसरीकडे चंद्रिकापुरे पिता-पुत्राने प्रफुल्ल पटेल-अजित पवार यांनी गद्दारी केल्याचा आरोप केला. बच्चू कडूच्या प्रहार आघाडीतून मुलगा सुगत चंद्रिकापूरे यांना मैदानात उतरविले. प्रहार आघाडीचा या मतदार संघात शुन्य आधार आहे. उरला प्रश्न राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचा आहे. त्यात कार्यकर्ते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत आहेत. गद्दारी आणि खुद्दारीवर लोक म्हणू लागले. शरद पवार यांच्यासोबत गद्दारी करताना खुद्दारी का आठवली नाही.असा प्रश्न करून पिता-पूत्राची खिल्ली उडवली जात आहे. महायुतीसाठी अर्जुनी/मोरगाव ही जागा सर्वाधिक सुरक्षित बनली आहे. प्रश्न एवढाच शिल्लक आहे. घड्याळ चिन्ह मतदारांपर्यत पोहचविण्याचा आहे. तसेच अतिआत्मविश्वासात प्रचाराकडे दुर्लक्ष केल्यास निवडणूक अडचणीची ठरू शकते.