अग्नीवीर भरती नागपुरात, 11 जिल्ह्यातील युवक येणार
अग्निवीर चाचणी मानकापूर क्रीडा संकुलात ,यंत्रणा सज्ज
नागपूर दि. 17: अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया आज 17 तारखेपासून मानकापूर क्रीडा संकुल येथे सुरू झाल्या. जिल्हा प्रशासनाच्यावतीने उमेदवारांच्या निवडीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
17 सप्टेंबरच्या रात्री बारा वाजता पासून निवड प्रक्रिया सुरु होणार आहे. आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मानकापूर क्रीडा संकुलनाची पाहणी केली. येणाऱ्या उमेदवारांच्यासाठीच्या स्वच्छता, बसण्याची व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेबाबत चौकशी केली. बाहेर रस्त्यांवर उमेदवारांची गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
विदर्भातील होणाऱ्या या पहिल्या अग्निवीर मेळाव्यात विदर्भातील 10 जिल्ह्यांमधून 60 हजार उमेदवार सहभागी होतील. भरती प्रक्रियेसाठी सैन्याकडून 150 कर्मचारी येणार आहे. या भरतीप्रक्रियेत अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या 10 जिल्ह्यांमधून उमेदवार येणार आहेत. या उमेदवारांना भरती मैदानावर नेण्या-आणण्यासाठी बसस्थानक, रेल्वेस्थानक ते विभागीय क्रीडा संकुल मानकापूर अशी महानगरपालिकेच्या सिटी बसेसची व्यवस्था सेल्फपेड तत्वावर उपलब्ध राहील. ही सुविधा रात्रीही राहील.
जे उमेदवार स्वत:ची वाहने आणतील त्यांनी मुक्कामाच्या ठिकाणी पोहचल्यानंतर वाहने कस्तुरचंद पार्क येथे रवाना करावित तेथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यावर वाहने उभी करून गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. भरतीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त राहणार असून प्रवेशपत्र असलेल्या उमेदवारांशिवाय इतरांना प्रवेश मिळणार नाही.
उमेदवारांच्या थांबण्याची व्यवस्था विभागीय क्रीडा संकुल मानकापूर गेट क्रमांक एकच्या आतील पार्किंग मैदानावर करण्यात आली आहे. उमेदवारांनी थांबण्यासाठी याच जागेचा उपयोग करावा, यामुळे इतरांना त्रास होणार नाही. मैदानावर पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट याची व खाण्याच्या स्टॉलची सशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. जे उमेदवार चाचणीत उत्तीर्ण होतील ते मेडीकल चाचणीकरीता थांबतील, त्यांच्या भोजनाची प्रशासनातर्फे नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.
उमेदवारांच्या सुरक्षिततेसाठी व आपातकालीन वैद्यकीय व्यवस्थेसाठी महानगरपालिका व जिल्हा परिषद प्रशासनातर्फे वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, इमर्जंसी मेडीकल कीटची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर पोलीस प्रशासनातर्फे कायदा व व्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस विशेष शाख व वाहतूक नियंत्रण शाखा यांच्याकडून व्यवस्था करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाच्या अग्निशमन विभाग घनकचरा व्यवस्थापन विभाग पाणी पुरवठा विभाग वैद्यकीय विभाग तसेच परिवहन विभागातर्फे सैन्य भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांकरिता आवश्यक सुविधा वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
देशाच्या रक्षणासाठी व आपल्या सर्वांच्या सौरक्षणासाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या भरतीसाठी नागपूरात येणाऱ्या उमेदवारांचे नागपूर जिल्हा प्रशासन आणि सैन्य भरती कार्यालयांकडून स्वागत करण्यात येत आहे.
या सैन्य भरती प्रक्रियेदरम्यान क्रीडा विभागाच्या विभागीय क्रीडा संकुलामधील पूर्वनियोजित स्पर्धा, उपक्रम वेळापत्रकानुसारच होतील. यासाठी संकुलाचे गेट क्रमांक दोन नियमित वापरासाठी खुले राहील. या भरती प्रक्रियेत उमेदवार एकाचवेळी मोठ्या संख्येत उपस्थित राहू शकतात. नागरिकांनी सैन्य भरतीच्या या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.