info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  14 Sep 2024

सदृढ लोकशाहीसाठी तटस्थ पत्रकारितेची गरज-नितीन गडकरी


-पदविका पत्रकारिता अभ्यासक्रमाला सहकार्याची गडकरी यांची घोषणा
-सुपारीबाज पत्रकारांना आवर घाला
*नागपूर, दि.14-* पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. ध्येयवादी पत्रकारांनी हा स्तंभ मजबूत केला. अलिकडे तटस्थ पत्रकारिता करणारे पत्रकार घटले. सुपारीबाज पत्रकार वाढले. त्यांचा प्रेस क्लब व पत्रकार  संघटनांनी बदोबस्त करावा असे आवाहन केंद्रीय रस्ते,महामार्ग व वाहतूक  मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

विदर्भ गौरव प्रतिष्ठान, नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने स्व.अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार-2023 उपराजधानीतील चार पत्रकारांना देण्यात आला. त्यात लोकमतचे संपादक श्रीमंत माने, ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे, रामू भागवत, राम भाकरे यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरूण चौधरी होते. मंचावर विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीॆश गांधी, प्रेस क्लब नागपूरचे अध्यक्ष प्रदिप मैत्र, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रम्हा त्रिपाठी, निलेश खांडेकर, बाळ कुळकर्णी मंचावर होते. 

गडकरी पुढे म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा प्रहरी असतो. अनेक पत्रकारांनी आयुष्यभर मूल्य जपले. मूल्यांशी तडजोड केली नाही. ते  गरिबीत जगले. आजच्या सुपारीबाज पत्रकारांकडे मौल्यवान गाड्या,बंगले आहेत. जुन्या पत्रकारांनी संघर्षशील पत्रकारिता केली. त्यांचे अनुभव नव्या पिढीला घडू द्या. त्यासाठी पदविका अभ्यासक्रम सुरू करा. त्यासाठी आवश्यक मदत करेन अशी त्यांनी घोषणा केली.या घोषणेचे टाळ्यांच्या गडगडात स्वागत करण्यात आले.

गडकरी पुढे म्हणाले, भारतीय लोकशाही सदृढ व्हावी. त्यासाठी न्यायपालिका, पत्रकारिता, कार्यपालिका आणि राजकारण्यांनी आदर्श व तटस्थपणे कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे. कार्यातून राजकारणी आणि पत्रकारांनी समाजापुढे आदर्श निर्माण करावा.या शब्दात त्यांनी पत्रकार व राजकारण्यांचे सुध्दा चिमटे काढले. तसेच  सुपारीबाज पत्रकारांच्या दहशतीचा एका अभियंत्याचा अनुभव सांगितला. प्रदिप मैत्र यांनी पुरस्कारासाठी निवडल्या गेलेल्या पत्रकारांच्या पत्रकारितेतील संघर्षाची माहिती दिली. गिरीश गांधी यांनी स्व.अनिलकुमार पत्रकारिता पुरस्काराचे हे चाळीसावे वर्ष असल्याचे सांगितले. ब्रम्हा त्रिपाठी यांनी पाहुण्याचे स्वागत केले. पुरस्कारप्राप्त पत्रकार कार्यक्रमाला सपत्निक हजर होते. त्यांचेही सत्काराला उत्तर देणारी छोटेखानी भाषणे झाली. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मंडळी आणि पत्रकारांनी हजेरी लावली.
▪▪▪▪▪▪▪▪