परसोडी बायपास मार्गाला निधी मिळणार
-गोंदियात दिले निवेदन, पालकमंत्र्याची हिरवी झेंडी
गोंदिया, दि.24- परसोडीतील वाढते अपघात.धुळामुळे लोकांचे बिघडणारे आरोग्य व अन्य आजारांपासून सुटका करा. त्यासाठी एक कोटी रूपयांची तरतूद करा आणि परसोडी बायपास मार्ग करा, अशी मागणी परसोडीवासियांच्या शिष्टमंडळाने गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री व वने,सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.
परसोडी ग्रामपंचायतचे सरपंच तुळशिदास शिवणकर, माजी सरपंच हरिदास हत्तीमारे यांनी गोंदियात ना. मुनगंटीवार यांची भेट घेतली. त्यांना एक निवेदन दिले. त्यात बायपास मार्गाचे डिझाईन, मातीकाम व अन्य कामासाठी सुमारे एक कोटी रूपये खर्च येईल. या खर्चाची तरतूद डीपीडीसी बैठकीत करण्याची मागणी केली.
ना.मुनगंटीवार डीपीडीसी बैठकीसाठी सोमवारी एक दिवसाच्या गोंदिया जिल्हा दौऱ्यावर आले होते. ते बैठकीला जात असतानाच रस्त्यात गाठले. तेव्हा त्यांनी त्याच ठिकाणी समस्या समजून घेतली. मागणी मजूर केली. कारच्या आधाराने निवेदनावर स्वाक्षरी केली. मागणी मंजूर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवणकर व हत्तीमारे यांनी मंत्री महोदयांना सांगितले की, अगोदर गावातून सायकल व बैलबंडी जात . आता ट्रक, स्कूल बसेस, मेटँडोर, ट्रक्टर, कार,ऑटो जातात. त्यामुळे गावातून जाणारा मार्ग संकट बनला आहे. वाहनांची संख्या भरमसाठ वाढली. त्यामुळे अपघात व भांडणे रोजची झाली. धुळाचा वेगळा त्रास वाढला. ही गंभीर बाब पालकमंत्र्याच्या लक्षात येताच हा प्रश्न निश्चित सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
हा प्रायोजित बायपास मार्ग परसोडी धान्य खरेदी केंद्राजवळून तलावाच्या काठाने जात पुढे पांदण रस्त्यावरून डोंगरगाव मार्गाला मिळेल. डोंगरगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच ज्ञानेश्वर खोटेले यांनी निवेदन दिले. त्यात एक कोटी रूपये खर्चाची उमरझरी पाणी योजना व नळ जोडणी कामाची मागणी केली.रखडलेल्या पुलाकडेही लक्ष वेधले. गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहांगडाले यांनी जि.प. योजनांसाठी निधीची मागणी केली.