info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  02 Oct 2022

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरू -विजयलक्          नागपूर दि. 02 : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2023 साठी 1 आक्टोबरपासून मतदार नोंदणी प्रक्रीया सुरू होत आहे. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रम निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पात्र शिक्षकांनी निवडणूक आयोगाने जारी केलेला नमूना क्र. 19 भरून मतदार व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे केले.

            विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. 1 ऑक्टोबर 2022 पासून मतदार नोंदणी अधिनियम 1960 च्या कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासोबतच नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2023 साठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

            दि. 15 ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31(4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसची प्रथम पूनर्प्रसिध्दी होईल. 25 ऑक्टोबर रोजी दुसरी व अंतीम सूचना प्रसारित झाल्यानंतर 7 नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्विकारण्याचा अंतिम दिनांक राहील.    19 नोव्हेंबर रोजी हस्तलिखीते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई केल्या जाईल. 23 नोव्हेंबरला प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी केल्या जाईल. तसेच यासंबंधी दि. 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी असेल. दावे व हरकती निकाली काढणे, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्याची तारीख 25 डिसेंबर 2022 आहे. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 30 डिसेंबर रोजी होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 1 ऑक्टोबर 2022 पासून तर 9 डिसेंबर 2022 पर्यंत दोन टप्प्यांमध्ये आपल्या नावाची नोंदणी करण्याची संधी मतदारांना मिळणार आहे. यासाठी निवडणूक विभागाचा नमुना 19 भरणे अनिवार्य आहे.

            यापूर्वीची शिक्षक मतदार संघाची यादी विचारात घ्यावयाची नसून नव्याने मतदार याद्या तयार करावयाच्या असल्याने सर्व पात्र व्यक्तींनी शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमूना क्र. 419 मध्ये पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करावे. एकत्रित गठ्ठा पध्दतीने किंवा टपालाव्दारे गठ्ठ्याने अर्ज स्विकारण्यात येणार नाही. परंतू, कुटुंबातील एक व्यक्ती एकत्रित सर्वांचे अर्ज सादर करु शकेल. तसेच पात्र शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या संस्थेतील पात्र व्यक्तींच्या अर्जाची तपासणी व छाननी करुन विहीत नमुन्यातील प्रमाणपत्रासह अर्ज विधानसभा मतदारसंघनिहाय वेगळे करुन सादर करावे, अशा सूचनाही श्रीमती बिदरी यांनी यावेळी दिल्या.

*कोण करू शकतो मतदान :*

      मतदार हा भारतीय नागरीकत्व असणारा व नागपूर शिक्षक मतदारसंघामध्ये सर्वसाधारण रहिवासी असणे आवश्यक आहे. नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील माध्यमिक व त्यावरील शैक्षणिक संस्थांमध्ये 1 नोव्हेंबर 2016 ते 1 नोव्हेंबर 2022 या सहा वर्षाच्या कालावधीत सलग किंवा टप्प्याटप्प्याने किमान तीन वर्ष शिक्षक म्हणून सेवा केलेला शिक्षकच यासाठी पात्र मतदार आहे. शैक्षणिक कार्य केल्याबाबतचे शैक्षणिक संस्था प्रमुखाचे विहित नमून्यातील प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहणार आहे. सोबतच निवडणूक आयोगाचा फॉर्म 19 भरणे प्रत्येकाला अनिवार्य आहे. शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी प्रत्येक निवडणुकीला नव्याने मतदार यादी तयार होते. यासाठी दरवेळी नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत मतदारालाच मतदान करण्याचा हक्क आहे.