वार्ताहर: साहिल येरने
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवास भाडे सवलतीसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच एनसीएमसी अनिवार्य केल्यानंतर गडचिरोली विभागात या डिजिटल बदलाला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. १ ऑक्टोबरपासून राज्यभरात लागू झालेल्या या नियमाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली विभागातील विविध आगारांमध्ये एनसीएमसी कार्डद्वारे ३ हजार ८४ तिकिटांची यशस्वी विक्री झाली. या तिकीट विक्रीतून राज्य परिवहन महामंडळाच्या तिजोरीत १ लाख ११ हजार ३२४ रुपयांचा महसूल थेट जमा झाला आहे. याशिवाय कार्डचा पुढील प्रवास सुरळीत व्हावा यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर कार्ड रिचार्ज करण्याला पसंती दिली असून पहिल्याच दिवशी टॉपअपपोटी तब्बल २ लाख ६० हजार २०० रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या गडचिरोली विभागात पहिल्याच दिवशी झालेली ही आर्थिक उलाढाल डिजिटल व्यवहारांकडे नागरिकांचा वाढता कल अधोरेखित करणारी ठरली आहे. राज्य शासनाने महिलांसाठी सुरू केलेली महिला सन्मान योजना तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना दिलेला मोफत प्रवासाचा लाभ यापुढे पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी महामंडळाने हे पाऊल उचलले आहे. रोख विरहित प्रवासाला गती देणे, बनावट ओळखपत्रांच्या आधारे होणारा गैरवापर रोखणे आणि सवलतींच्या वितरणाची अचूक आकडेवारी डिजिटल प्रणालीवर उपलब्ध करणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. गडचिरोली, ब्रह्मपुरी आणि अहेरी या तिन्ही प्रमुख आगारांमधून धावणाऱ्या बसेसमध्ये वाहकांकडील अद्ययावत ई-तिकीट मशिन्सद्वारे हे कार्ड स्कॅन करून प्रवाशांना तत्काळ तिकिटे दिली जात आहेत. कार्डच्या वापरामुळे सुट्या पैशांच्या कारणावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये होणारे किरकोळ वाद कमी होण्यास मदत होत असून प्रवासाची वेळही वाचत आहे. महामंडळाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सुरुवातीला ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ज्या प्रवाशांकडे अद्याप प्रत्यक्ष प्लास्टिक स्मार्ट कार्ड पोहोचलेले नाही, त्यांच्यासाठी तात्पुरती दिलासादायक व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रवाशांना नोंदणीची ३० दिवस वैध असणारी अधिकृत क्यूआर कोड पावती ग्राह्य धरून प्रवास करण्याची सवलत प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे कार्ड मिळण्यास विलंब झाला तरी नागरिकांचा सवलतीचा प्रवास खंडित झालेला नाही. गडचिरोली विभागात अहेरीसारख्या अतिदुर्गम भागातही प्रवाशांनी रांगा लावून कार्ड नोंदणी आणि टॉपअप करून घेतले आहे, ही बाब प्रशासनासाठी दिलासादायक ठरली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे डिजिटायझेशन करण्याच्या दिशेने हा निर्णय मैलाचा दगड ठरत आहे. प्रवाशांना आता प्रत्येक वेळी ओळखपत्र सोबत बाळगण्याची किंवा वाहकाकडे कागदपत्रे दाखवून पडताळणी करण्याची गरज उरलेली नाही. कार्ड मशिनवर टॅप करताच संगणकीय प्रणालीद्वारे प्रवाशाची पात्रता आणि लागू होणारी सवलत थेट मोजली जाते. यामुळे महामंडळाच्या प्रशासकीय कामकाजातील मानवी चुका टळण्यास मदत होत असून प्रत्येक सवलतधारक प्रवाशाची नोंद मध्यवर्ती सर्व्हरवर तत्काळ उपलब्ध होत आहे. भविष्यात हेच एनसीएमसी कार्ड मेट्रो, स्थानिक परिवहन उपक्रम आणि रेल्वे प्रवासासाठीही वापरता येणे शक्य होणार असल्याने प्रवाशांना एकाच कार्डावर संपूर्ण प्रवास व्यवस्थापनाची सुविधा मिळणार आहे. पहिल्या दिवसाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, नक्षलग्रस्त व दुर्गम मानल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकही आता डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास सज्ज झाले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात काही ठिकाणी नेटवर्क आणि सर्व्हरच्या तांत्रिक अडचणी समोर आल्या असल्या तरी महामंडळाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी त्यावर मात करत व्यवहार सुरळीत ठेवले. एसटी महामंडळाने आगार पातळीवर विशेष मदत कक्ष सुरू करून प्रवाशांना कार्ड मिळवणे, माहिती भरणे आणि टॉपअप प्रक्रियेत मदत केली आहे. येत्या काही दिवसांत कार्डधारकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे रोख रकमेचा वापर पूर्णपणे थांबून महामंडळाची आर्थिक शिस्त अधिक मजबूत होणार आहे.











Leave a Reply