मुंबई: कोकणवासियांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली असून मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – सावंतवाडी रोड दैनंदिन एक्स्प्रेस गुरुवारी मार्गस्थ केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. गाडी क्रमांक ०१००१ सीएसएमटी – सावंतवाडी रोड दैनंदिन एक्स्प्रेसचा उद्घाटन सोहळा सीएसएमटी स्थानकात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती लावली. तसेच या कार्यक्रमास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री नितेश राणे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, खासदार मिलिंद देवरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पहिल्या प्रवासासाठी ही गाडी सीएसएमटीहून दुपारी १२.५० वाजता रवाना झाली असून ती मध्यरात्री २ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचणार आहे. मुंबईहून दक्षिण कोकणात जाणाऱ्या रेल्वे सेवेतील ही एक महत्त्वाची भर मानली जात असून प्रवाशांना यामुळे नियमित आणि दैनंदिन प्रवासाचा मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे.
सीएसएमटी – सावंतवाडी रोड दैनंदिन एक्स्प्रेस मार्गस्थ; कोकणवासियांची मागणी पूर्ण














Leave a Reply