स्थान: गोंदिया
गोंदिया : दिवाळी आणि सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन, गोंदिया यांनी जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत ६५ अन्न व्यवसाय आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यातून सुमारे १० लाख ९० हजार रुपये किमतीचा ४ हजार ६८५ किलोहून अधिक अप्रमाणित आणि असुरक्षित अन्नसाठा जप्त करण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९ आस्थापनांचे परवानेही निलंबित करण्यात आले.
तपासणी आणि दंडात्मक कारवाई
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ३६ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. सहा प्रकरणांमध्ये तडजोडीची कारवाई करून ७३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तपासणीदरम्यान ५५ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. काही नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असून, ते प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
घरगुती फराळ विक्रेत्यांनाही FSSAI नोंदणी आवश्यक
दिवाळीत महिला बचतगट, गृहउद्योग आणि वैयक्तिक विक्रेत्यांकडून चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे, करंजी यांसारख्या फराळ पदार्थांची विक्री केली जाते. घरगुती स्तरावर खाद्यपदार्थ तयार करून दुकानातून, ऑर्डरनुसार किंवा सोशल मीडिया आणि ऑनलाइन माध्यमांतून विक्री करणाऱ्यांनाही अन्न सुरक्षा व मानके अधिनियम लागू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रत्येक घरगुती फराळ विक्रेत्याने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांची नोंदणी किंवा आवश्यक परवाना घेणे बंधनकारक आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२६ पासून छोट्या अन्न व्यावसायिकांसाठी नोंदणीची वार्षिक उलाढाल मर्यादा १.५ कोटी रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. त्यापुढील उलाढालीनुसार राज्य किंवा केंद्रीय परवाना घेणे आवश्यक आहे. अर्ज FSSAI च्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरून करता येतो.
फराळाच्या पाकिटावर उत्पादनाचे नाव, उत्पादकाचे नाव व पत्ता, FSSAI नोंदणी किंवा परवाना क्रमांक, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम मुदत, घटकांची यादी आणि निव्वळ वजन नमूद करणे आवश्यक आहे. ऑनलाइन विक्रीच्या जाहिरातींमध्येही परवाना क्रमांक नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्वच्छता आणि गुणवत्ता नियमांचे पालन करा
चकली, चिवडा, नमकीन, मिठाई उत्पादक आणि खाद्यतेल पुनर्पॅकिंग करणाऱ्या व्यावसायिकांनी कच्चा माल परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावा. तळण्यासाठी तेलाचा वारंवार वापर टाळावा. कच्चा आणि तयार अन्नपदार्थ स्वच्छ, हवेशीर व किटकमुक्त ठिकाणी साठवावेत.
अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छ कपडे, ॲप्रन, हेअरनेट, मास्क आणि हातमोजे वापरणे आवश्यक आहे. उत्पादन परिसर, भांडी व यंत्रसामग्री नियमित स्वच्छ ठेवावी. पॅकबंद पदार्थांवर आवश्यक लेबलिंग करावे आणि प्रतिबंधित रंगांचा वापर टाळावा. वैध FSSAI परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र ग्राहकांना सहज दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करावे. कच्च्या मालाच्या खरेदी पावत्या, पाणी तपासणी अहवाल आणि कीटक नियंत्रणाचे अभिलेख अद्ययावत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
विनापरवाना व्यवसाय, सुधारणा नोटिसीनंतरही त्रुटी दूर न करणे किंवा निकृष्ट व असुरक्षित अन्नपदार्थांची विक्री केल्यास परवाना निलंबित किंवा रद्द करणे, अन्नसाठा जप्त करून नियमानुसार नष्ट करणे, दंड आकारणे तसेच न्यायालयात खटला दाखल करणे अशी कारवाई होऊ शकते. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर अधिक कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांनी फराळ आणि इतर खाद्यपदार्थ खरेदी करताना पाकिटावरील FSSAI क्रमांक, उत्पादन दिनांक आणि वापरण्याची अंतिम मुदत तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अन्न व्यवसाय चालकांची गय केली जाणार नसून, जिल्ह्यात नियमित आणि आकस्मिक तपासणी सुरू राहणार असल्याचे सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, गोंदिया यांनी कळविले आहे.














Leave a Reply