चवदार तळे सत्याग्रहाचा इतिहास पोहोचणार जनतेपर्यंत
मुंबई | प्रतिनिधी
मुंबईत प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर युगंधर क्रिएशन्स एल.एल.पी. प्रस्तुत ‘पाण्याने पेटला वणवा’ हे ऐतिहासिक मराठी नाटक आता महाराष्ट्रभराच्या दौऱ्यावर निघाले आहे. ३ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यातील दहा प्रमुख शहरांमध्ये या नाटकाचे प्रयोग सादर होणार असून, सामाजिक न्याय, समानता आणि स्वाभिमानाचा इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर साकारलेल्या या नाटकाने मुंबईतील प्रयोगांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली. इतिहासाला केवळ आठवणींत न ठेवता तो नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी हे नाटक पार पाडत असल्याची भावना अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली.
२० मार्च १९२७ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह हा भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानला जातो. सार्वजनिक पाणवठ्यावरून पाणी पिण्याचा अधिकार मिळविण्यासाठी झालेला हा संघर्ष प्रत्यक्षात मानवी स्वाभिमान, समानता आणि सामाजिक न्यायासाठी उभारलेली क्रांती होती. या ऐतिहासिक घटनेचा आशय आणि त्यामागील विचार प्रभावी नाट्यरूपाने ‘पाण्याने पेटला वणवा’ मधून प्रेक्षकांसमोर उभा केला जातो.
या नाटकाचा महाराष्ट्र दौरा ३ ऑगस्ट रोजी नाशिक येथून सुरू होणार आहे. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी धुळे, ५ ऑगस्ट रोजी नंदुरबार, ६ ऑगस्ट रोजी जळगाव, ७ ऑगस्ट रोजी बुलढाणा, ८ ऑगस्ट रोजी जालना, ९ ऑगस्ट रोजी परभणी, १० ऑगस्ट रोजी बीड, ११ ऑगस्ट रोजी औरंगाबाद आणि १२ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील विविध भागातील रसिकांना हे नाटक पाहण्याची संधी मिळणार आहे.
या नाटकाचे लेखन आणि गीतरचना आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे, तर दिग्दर्शनाची धुरा प्रशांत निगडे यांनी सांभाळली आहे. नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन वेगवेगळ्या कालखंडांचा प्रभावी संगम. एका बाजूला शंभर वर्षांपूर्वीचा महाड सत्याग्रह आणि दुसऱ्या बाजूला आजचे सामाजिक वास्तव यांना जोडत हे नाटक प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते.
शारदा राजकुमार बडोले निर्मित आणि गणेश कृ. मोडक सहनिर्मित या नाटकाला मंदार देशपांडे यांचे संगीत लाभले आहे. वेशभूषा सुप्रिया बर्वे, रंगभूषा मिलिंद कोचरेकर, तर नेपथ्य सुशील पांचाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारले आहे.
या नाटकात सशांक पांचाळ, मयुरेश मढवी, मयुरी निकम, तेजस राजे, राजू भिलारे, अजित रांजणे, दत्ता शेट्ये, अमोल जाधव, सुबोध हर्डीकर, सायली नंदा, मृणालिनी, महादेव जाधव, मृणाल खिस्मतवार, प्रेम जेटीथोर यांच्यासह अनेक कलाकार विविध भूमिका साकारत असून, त्यांच्या अभिनयामुळे इतिहासातील संघर्ष प्रेक्षकांसमोर जिवंत उभा राहतो.
मुंबईतील यशस्वी प्रयोगांनंतर आता महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांमध्ये या नाटकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. केवळ मनोरंजन न करता समाजाला विचार करायला लावणारे, इतिहासाची जाणीव करून देणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारे हे नाटक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील एक महत्त्वपूर्ण कलाकृती ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





Leave a Reply