वार्ताहर : Super Admin | महाराष्ट्र
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक तयारीचा आढावा
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरळीत, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी संबंधित सर्व नोडल अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने, नियोजनबद्ध आणि ठरवून दिलेल्या कालमर्यादेत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या बैठकीत ते निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेत होते.
बैठकीला प्रमुख अधिकारांची उपस्थिती
या आढावा बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रचना इंदुरकर, उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) इंदिरा चौधरी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मलिक विराणी, उपजिल्हाधिकारी गणेश मारकड, उपजिल्हाधिकारी अमोल कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दौंड यांच्यासह विविध उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबंधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच, नागपूर जिल्ह्यातील सर्व नायब तहसीलदार व तलाठी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) या बैठकीस जोडले गेले होते.
मतदान आणि मतमोजणीचे वेळापत्रक
निवडणूक कार्यक्रमानुसार आगामी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याशिवाय, निवडणुकीची मतमोजणी दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असल्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. या निर्धारित वेळापत्रकानुसारच सर्व प्रशासकीय तयारी वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
साहित्य वाटप आणि प्रशिक्षण नियोजन
निवडणुकीसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी आणि त्याचे वाटप अतिशय जबाबदारीने व वेळेत करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. उद्या नियोजन भवन येथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे योग्य नियोजन करावे. मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटपासाठी आवश्यक टेबलची संख्या निश्चित करून त्यानुसार कार्यवाही करावी आणि त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश त्वरित निर्गमित करावेत. मतपत्रिका आणि मतपेटी सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मतदानासाठी लागणारे विशेष पेन तसेच इतर आवश्यक साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे. मतदार याद्या अचूक असाव्यात आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्यांचे तात्काळ वाटप करावे. टपाली मतपत्रिका वितरित करण्याची प्रक्रिया पूर्ण जबाबदारीने पार पाडून त्यांच्या संकलनाची योग्य पद्धत राबवावी आणि प्राप्त होणाऱ्या मतपत्रिकांचा अहवाल सातत्याने अद्ययावत ठेवावा, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
वाहतूक व्यवस्था आणि स्ट्रॉंग रूमचे नियोजन
निवडणूक प्रक्रियेदरम्यान वाहतूक व्यवस्थेचे नियोजन अतिशय काटेकोर असावे. वाहन अधिग्रहण, व्यवस्थापन आणि त्याचा आराखडा अचूक असला पाहिजे. नागपूर जिल्ह्यातील संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना त्यांच्या मागणीप्रमाणे वाहने उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. प्रत्येक मतदान केंद्रासाठी आवश्यक वाहने आणि वाहतूक व्यवस्थेचे तंतोतंत नियोजन करण्याच्या कामाची जबाबदारी तहसीलदार व तलाठी यांच्यावर सोपवण्यात यावी, असे श्री. आशीर्वाद यांनी स्पष्ट केले. तसेच स्ट्रॉंग रूमच्या कामांबाबतचे अंदाजपत्रक त्वरित सादर करून त्या कामास तात्काळ सुरुवात करावी. मतमोजणीच्या नियोजित दिनांकाच्या पार्श्वभूमीवर ही सर्व कामे जलद गतीने पूर्ण करावीत. निवडणुकीच्या कोणत्याही कामात कसूर न करता सर्व संबंधित यंत्रणेने अत्यंत अचूक व वेळेत काम पूर्ण करावे, अशी ताकीद जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिली.










Leave a Reply