वार्ताहर : हार्दिक उके |
राजासारखे जगलो हीच माझी चूक: विजय मल्ल्याचा सवाल
किंगफिशर एअरलाइन्सचा माजी प्रमुख आणि फरार उद्योगपती विजय मल्ल्या याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. "मी माझ्याच पैशाने राजासारखं आयुष्य जगलो आणि हीच माझी सर्वात मोठी चूक ठरली, ज्याची शिक्षा मला आता दिली जात आहे. मी अजूनही चोरच आहे का?" असा सवाल मल्ल्याने उपस्थित केला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एका जुन्या आदेशातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने हा दावा केला आहे.
कायदेशीर लढा आणि प्रत्यार्पणाचे प्रयत्न
किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमुख असलेला विजय मल्ल्या हा २०१६ मध्ये भारतातून ब्रिटनला पळून गेला होता. त्यानंतर २०१९ मध्ये भारतीय यंत्रणांनी त्याला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणून घोषित केले. सध्या भारत सरकार त्याच्या ब्रिटनमधून प्रत्यार्पणासाठी सातत्याने कायदेशीर लढा देत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशाचे फोटो शेअर करताना मल्ल्याने लिहिले की, सर्वांच्या वर एक देव आहे आणि कधीतरी मला नक्कीच न्याय मिळेल. त्याने पोस्ट केलेले हे पान २०१८ च्या एका निर्णयातील आहे.
कर्जाच्या रकमेपेक्षा दुप्पट वसुलीचा दावा
या आदेशात १७ डिसेंबर २०२४ रोजी अर्थमंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या वक्तव्याचा संदर्भ देण्यात आला आहे. त्या माहितीनुसार, मल्ल्याकडून युनायटेड ब्रुअरीज लिमिटेडमधील शेअर्सव्यतिरिक्त तब्बल १४,१३१.६ कोटी रुपयांची मालमत्ता बँकांच्या कंसोर्टियमकडे म्हणजेच बँकांच्या समूहाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. किंगफिशर एअरलाइन्सवर बँकांचे मूळ कर्ज ६,२०३ कोटी रुपये एवढे होते.
न्यायालयाचे निरीक्षण आणि कायदेशीर वादावर पडदा
खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केले की, कर्जाच्या रकमेपेक्षा दुपटीहून अधिक वसुली झाली असल्यामुळे बँकांचे बाकी थकीत पैसे आता जवळपास पूर्ण वसूल झाले आहेत. त्यामुळे आता बँकांनी UBL च्या शेअर्सवर दावा सांगण्यात काहीही औचित्य उरलेले नाही. कर्जवसुलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता केंद्र सरकार आणि बँकांच्या समूहाने या कायदेशीर वादावर पडदा टाकायला हवा, असेही न्यायालयाने म्हटले होते. मात्र, याच निर्णयात न्यायालयाने मल्ल्याच्या वर्तनावर अतिशय कडक टिप्पणी देखील केली होती.










Leave a Reply