लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement

शेतकरी प्रमाणपत्रांमुळे महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार

शेतकरी प्रमाणपत्रांमुळे महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार

वार्ताहर : Super Admin | महाराष्ट्र

नागपूर, दि. १६: महिला शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शेतकरी प्रमाणपत्रांमुळे त्यांची अधिकृत ओळख निर्माण होणार असून विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना सुलभरित्या घेता येईल. या माध्यमातून कृषी उत्पादन, पोषण सुरक्षा आणि शाश्वत शेतीमध्ये सकारात्मक सुधारणा घडून येण्यास मदत होईल, असे प्रतिपादन वनामतीच्या संचालक आशा पठाण यांनी केले.

प्रादेशिक कार्यशाळा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ व महिला किसान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती येथे प्रादेशिक कार्यशाळा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन वनामतीच्या संचालिका श्रीमती आशा पठाण यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांनी महिला शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण साधण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमास विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे, 'आत्मा'चे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू, 'आत्मा'च्या प्रकल्प उपसंचालक पल्लवी तलमले, पोषण तज्ज्ञ डॉ. रेणुका मायंदे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. सरिता मोवाडे, आणि प्रगतिशील महिला शेतकरी सुनिता वाधवा प्रामुख्याने उपस्थित होते.

विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांनी महिला शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन, रेशीम उद्योग आणि कृषी प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. पोषण तज्ज्ञ डॉ. रेणुका मायंदे यांनी महिलांचे आरोग्य, रक्तक्षय प्रतिबंध व स्थानिक पौष्टिक अन्नघटकांच्या वापराबाबत सविस्तर माहिती दिली. कृषी शास्त्रज्ञ डॉ. सरिता मोवाडे यांनी जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढविणे, जैविक निविष्ठांचा वापर आणि पीक फेरपालटीचे महत्त्व उपस्थितांना समझावून सांगितले.

प्रस्ताविकात डॉ. अर्चना कडू यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासोबतच महिला शेतकऱ्यांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि थेट बाजारपेठेशी जोडणी करण्यासाठी आत्मा यंत्रणा कटिबद्ध असल्याचे सांगितले. प्रगतिशील महिला शेतकरी सुनीता वाधवा यांनी नैसर्गिक शेती व शेतमाल प्रक्रिया उद्योगातील आपले अनुभव यावेळी कथन केले.

सत्कार आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन

नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतिशील महिला शेतकऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात महिला बचत गटांनी तयार केलेल्या सेंद्रिय उत्पादनांचे, हस्तकलेचे आणि प्रक्रियायुक्त पदार्थांचे प्रदर्शन व विक्री स्टॉल्स लावण्यात आले होते, जे उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले.

या कार्यशाळेस कृषी विभागाचे अधिकारी आणि नागपूर विभागातून आलेल्या महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंत्र अधिकारी श्रीमती शुभांगी कामडी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती वैशाली पाटील यांनी मानले.