लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement

नागपुरात २५ ठिकाणी रोजगार मेळावे

स्थान: नागपूर

*नागपुरात २५ ठिकाणी रोजगार मेळावे*

‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रम; २९ सप्टेंबरला राज्यभर एकाचवेळी आयोजन

नागपूर, दि. १८ : “युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती” या संकल्पनेनुसार राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या निर्देशानुसार ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी व एकाच वेळी ५०० ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. नागपूर जिल्ह्यात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध शैक्षणिक संस्था, कौशल्य विकास केंद्रे, औद्योगिक संस्था आणि उद्योजकांच्या सहकार्याने २५ ठिकाणी मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.

या ठिकाणी होणार रोजगार मेळावे
सिम्बॉयसिस स्किल डेव्हलपमेंट सेंटर, नागपूर; भालेराव विज्ञान महाविद्यालय, सावनेर; लेमदेव पाटील महाविद्यालय, कुही; जी.एच. रायसोनी स्किल टेक युनिव्हर्सिटी, नागपूर; तायवाडे कॉलेज, कोराडी; आदित्य अनघा को-ऑप. बँक, नागपूर; ताई गोळवलकर महाविद्यालय, रामटेक; टाटा स्ट्राइव्ह स्किल सेंटर, पारडी; एमआयडीसी कौशल्य विकास केंद्र, बुटीबोरी; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ; बिंझानी महिला महाविद्यालय, महाल; रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ; भिवापूर महाविद्यालय; सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, विहिरगाव; सोनाताई पांडव पॉलिटेक्निक, काटोल; झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी; गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय; महात्मा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय, पारशिवनी; गुरुनानक कॉलेज ऑफ फार्मसी; शिवाजी विज्ञान महाविद्यालय, काँग्रेस नगर; मौदा कॉलेज ऑफ फार्मसी; रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय; बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि श्री पंढरीनाथ कला व वाणिज्य महाविद्यालय, नरखेड या ठिकाणी रोजगार मेळावे होणार आहेत.

नामांकित कंपन्यांचा सहभाग
या रोजगार मेळाव्यांमध्ये विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या व उद्योजक सहभागी होणार आहेत. यामध्ये डीबीसी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, एफिमेन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, हडगे ब्रदर्स, गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड, समर्थ इलेक्ट्रोकेअर प्रायव्हेट लिमिटेड, सेवा ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड, द युनिव्हर्सल ग्रुप असोसिएशन, एसबीआय लाईफ, इरोस इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड, टीई२टेक आयटी सोल्युशन, जायका मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रोव्हिन्शियल लाइफस्टाइल रिटेल सर्व्हिसेस (तनिष्क), कोलोसल स्किल्स प्रायव्हेट लिमिटेड, सिरसगाव इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, मानशा टूर्स प्रायव्हेट लिमिटेड, गिरिराज ऑटो, आर्या कार्स आणि लाइटहाऊस इन्फो सिस्टिम्स प्रा. लि. आदींचा सहभाग राहणार आहे.

विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना संधी
उपलब्ध रिक्त पदांनुसार दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, अभियांत्रिकी पदवी, पदव्युत्तर तसेच विविध व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आयटीआयमध्ये फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, टर्नर, इलेक्ट्रीशियन, मोटार मेकॅनिक, प्लंबर, CNC/VMC ऑपरेटर, मिलर, डिझेल मेकॅनिक आदी ट्रेडच्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.

तसेच यांत्रिक, सिव्हिल आदी शाखांतील डिप्लोमा/पदविका धारक, बी.ए., बी.एस्सी., बी.कॉम., बीबीए आदी पदवीधर, बी.ई./बी.टेक. (यांत्रिक, सिव्हिल, ईटीसी, इलेक्ट्रिकल आदी) तसेच एमबीए, पदव्युत्तर आणि आर्किटेक्ट व संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

उद्योजकांनी सहभागी व्हावे
जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. नागपूर जिल्ह्यातील रोजगार इच्छुक युवक-युवतींनी आपल्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभवास अनुरूप उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *