लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement

पळसगाव राका येथे ८२ वर्षीय वृद्ध महिलेचा गळा आवळून खून

स्थान: Sadak Arjuni

वार्ताहर: Kunal Badole

सडक अर्जुनी : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव राका येथे ८२ वर्षीय वृद्ध महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुसुम चैतराम कापगते (वय ८२) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घटना उघडकीस आली.
प्राथमिक माहितीनुसार, कुसुम कापगते या घरी एकट्या असल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला असावा. त्यानंतर त्यांचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या हातातील सोन्याच्या पाटल्या, एकदानी, अंगठी तसेच घरातील इतर सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे समोर आले आहे.
घरातील आलमारी फोडण्यात आल्याचेही आढळून आले असून, चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करून वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली का, या दिशेने पोलिस तपास सुरू आहे. चोरी गेलेल्या मुद्देमालाची नेमकी किंमत अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक गोरख भामरे, पोलीस अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगलझोडे, पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्यासह डुग्गीपार पोलिसांचे पथक आणि स्वान पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली आहे. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी तपास केला असून, आरोपीचा माग काढण्यासाठी विविध दिशांनी तपास सुरू आहे.
वृद्ध महिला घरी एकट्या असल्याची माहिती आरोपीला होती का, आरोपी परिचित व्यक्ती आहे की बाहेरील, तसेच घरातील दागिने व रोख रकमेची माहिती आरोपीला पूर्वीपासून होती का, या शक्यतांचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पळसगाव राका परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भरवस्तीत वृद्ध महिलेची हत्या झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची अधिकृत आणि सविस्तर माहिती पोलिसांकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे हत्येचे नेमके कारण, चोरी गेलेल्या मुद्देमालाची किंमत आणि आरोपीबाबतची माहिती पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *