• राज्य बाल हक्क आयोगाकडून पोलिसांची कार्यशाळा
नागपूर,दि.13 : बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच पोलिसांनी बालकांप्रती अधिक संवेदनशील आणि बालक-केंद्रित दृष्टिकोन ठेवून कार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, हॉप फॉर चिल्ड्रेन इंडिया आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बाल न्याय अधिनियम व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO Act) याबाबत जनजागृती कार्यशाळा आणि नागपूर शहर व ग्रामीण पोलीस विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाल पोलीस अधिकारी, चाईल्ड हेल्पलाईन, बाल कल्याण समिती आणि बाल न्याय मंडळ यांच्यासाठी आयोजित कार्याशाळा पोलीस आयुक्तालय, नागपूर येथे संपन्न झाली.
बालकांच्या हक्कांचे संरक्षण, बालकांवरील लैंगिक अत्याचारास प्रतिबंध, संबंधित कायदेशीर तरतुदी तसेच बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये विविध यंत्रणांची भूमिका व जबाबदाऱ्या याबाबत कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेस महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या श्रीमती गीतांजली बु्टी, सदस्य प्रवीण भुजाडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस अधीक्षक दीपक अग्रवाल, नागपूर ग्रामीण अनिल मस्के, बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा तथा न्यायाधीश भाग्यश्री कोठावळे, , महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उपायुक्त अर्पणा कोल्हे, माजी सदस्य महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग संजय सेंगर, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष छाया राऊत तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी बाल संरक्षण व्यवस्थेची सद्यस्थिती, बालकांच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेला विविध विभागांमधील समन्वय तसेच बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये प्रभावी कार्यवाही करण्याबाबत माहिती दिली.
कार्यशाळेत श्रीमती गीतांजली बु्टी, श्री. प्रवीण भुजाडे, न्या. भाग्यश्री कोठावळे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. तसेच माजी सदस्य महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग संजय सेंगर, हॉप फॉर चिल्ड्रेन फाऊंडेशनचे परम आनंद आणि वारिस शेख यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले.
यावेळी बालकांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी संबंधित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, बालकांच्या हक्कांबाबत व्यापक जनजागृती तसेच विविध शासकीय व संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचे मान्यवरांनी सांगितले. बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभाग, महिला व बाल विकास विभाग, बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती, चाईल्ड हेल्पलाईन तसेच स्वयंसेवी संस्थांनी समन्वयाने व संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यशाळेदरम्यान बालकांच्या संरक्षणाप्रती जनजागृती करणाऱ्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. या माध्यमातून बालकांच्या हक्कांचे संरक्षण, सुरक्षित वातावरण आणि बालकांवरील अत्याचारास प्रतिबंध याबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.




Leave a Reply