स्थान: Up Amroha
वार्ताहर: साहिल येरने
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात एका फार्महाऊसमध्ये २३ वर्षीय तरुणीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर गुन्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफचे दोन जवान आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांना अमरोहा पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे पोलीस दल आणि सुरक्षा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात असून संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी ही मूळची हरियाणा राज्यातील फतेहाबाद येथील रहिवासी आहे. तिला धार्मिक स्थळाचे दर्शन घडवून आणण्याचे आमिष दाखवून अमरोहा येथील हसनपूर परिसरातील झुलपुरी गावाजवळ असलेल्या एका फार्महाऊसवर आणण्यात आले होते. ही घटना २२ आणि २३ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार फार्महाऊसवर उपस्थित असलेल्या चारही जणांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यानंतर पीडितेने अत्यंत धाडसाने स्वतःला फार्महाऊसच्या एका खोलीत बंद करून घेतले आणि तातडीने ११२ या आपत्कालीन पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची याचना केली. घटनेचे गांभीर्य ओळखून अमरोहा पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी फार्महाऊसवर छापा टाकून पीडित तरुणीची सुटका केली आणि तिथेच बाहेर बसलेल्या चारही आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सीआरपीएफचे इन्स्पेक्टर लालाराम यादव, सीआरपीएफचे हेड कॉन्स्टेबल मोहित उर्फ विक्की, हसनपूर पोलीस ठाण्यात तैनात असलेले सब इन्स्पेक्टर म्हणजेच दरोगा संजय तोमर आणि हेड कॉन्स्टेबल प्रमोद मलिक यांचा समावेश आहे. या चौघांनाही पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले आहे. अमरोहाचे पोलीस अधीक्षक लखन सिंह यादव यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, पीडित तरुणी आरोपी मोहित आणि इन्स्पेक्टर लालाराम यांना आधीपासून ओळखत होती. प्राथमिक चौकशीनुसार हरियाणा येथे यापूर्वी त्यांची ओळख झाली होती. दर्शन घडवण्याच्या बहाण्याने तिला या फार्महाऊसवर आणले गेले आणि तिथे हा गुन्हा घडला. पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की, पीडितेच्या तक्रारीवरून संबंधित कलमांखाली तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक पोलीस ठाण्यातील सब इन्स्पेक्टर संजय तोमर आणि हेड कॉन्स्टेबल प्रमोद मलिक यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सीआरपीएफच्या दोन्ही आरोपी कर्मचाऱ्यांविषयी सविस्तर अहवाल सीआरपीएफच्या मुख्यालयाकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाला आणखी एक राजकीय वळण मिळाले असून ज्या फार्महाऊसमध्ये ही धक्कादायक घटना घडली, ते फार्महाऊस उत्तराखंडमधील खानपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार उमेश कुमार उर्फ उमेश शर्मा यांच्याशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. या माहितीनंतर स्थानिक पातळीवर आणि सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, आमदार उमेश कुमार यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही थेट संबंध नसल्याचे जाहीरपणे स्पष्ट केले आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडताना सांगितले की, घटनेच्या वेळी ते खानपूरमध्ये एका जाहीर रोडशोमध्ये उपस्थित होते आणि तेथे अनेक लोक साक्षीदार आहेत. फार्महाऊसवर गणवेशधारी पोलीस अधिकारी आणि सीआरपीएफचे जवान आल्यामुळे तेथील सुरक्षारक्षकाने गेट उघडले होते. या घटनेशी फार्महाऊस मालकाचा कोणताही संबंध नसून कायद्यानुसार दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते, अशा पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनीच अशा प्रकारचे कृत्य केल्यामुळे नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन आणि प्रशासन विविध योजना राबवत असताना थेट सुरक्षा यंत्रणेतील अधिकारीच अशा गुन्ह्यात अडकल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमरोहा पोलीस या प्रकरणात फॉरेन्सिक तपास आणि तांत्रिक पुराव्यांची मदत घेत असून फार्महाऊसवरील सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेचे वैद्यकीय अहवाल गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. अमरोहा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला आवश्यक वैद्यकीय मदत आणि समुपदेशन पुरवले जात असून न्यायालयासमोर तिचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही आणि निष्पक्षपणे कायदेशीर कारवाई केली जाईल असा विश्वास दिला आहे. गुन्ह्यातील प्रत्येक पैलूची सूक्ष्म तपासणी केली जात असून पुरावे भक्कम करून आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी विशेष तपास पथक कार्यरत आहे.
















Leave a Reply