लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement

अमरावती: रविनगर पुलावर महाविद्यालयीन तरुणीची हत्या, आरोपीला गोंदियातून अटक

स्थान: Amravati

वार्ताहर: साहिल येरने

अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रविनगर नाल्यावरील पुलावर गुरुवारी भरदुपारी एका साडेसतरा वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण घटनेने संपूर्ण अमरावती शहर हादरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शर्वरी गणेश हाडके (वय १७ वर्षे ६ महिने, रा. अंबा विहार, रविनगर) असे मृत तरुणीचे नाव असून ती शहरातील नामांकित श्री ब्रिजलाल बियाणी सायन्स कॉलेजमध्ये बी.एस्सी. प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. या प्रकरणात राजापेठ पोलीस आणि अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत आरोपी आनंद नंदकिशोर भड (वय २२ वर्षे, रा. पोही, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) याला अवघ्या काही तासांत गोंदिया येथून अटक केली आहे. गुरुवारी दुपारी १२.३० ते १२.४५ च्या सुमारास रविनगर पुलावर नेहमीप्रमाणे नागरिक आणि विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू होती. त्याचवेळी महाविद्यालयातून निघालेली शर्वरी आपल्या मोपेडवरून जात असताना आरोपी आनंद भड याने तिला वाटेत अडवले. त्यानंतर दोघांमध्ये काही वेळ वाद झाला आणि वादाचे रूपांतर तीव्र झटापटीत झाले. संतापाच्या भरात आरोपीने सोबत आणलेल्या स्वयंपाकघरातील धारदार चाकूने शर्वरीच्या गळ्यावर, छातीवर आणि पोटावर एकापाठोपाठ एक सपासप वार केले. तिच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूचे लोक धावून येईपर्यंत आरोपीने तिला रक्ताच्या थारोळ्यात पाडले आणि तो तातडीने आपल्या दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला. भररस्त्यात घडलेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड घबराट आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शर्वरीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र शरीरावरील वर्मी लागलेले खोल घाव आणि प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप चव्हाण, गुन्हे शाखाप्रमुख अतुल वर आणि दिनेश दहातोंडे यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्यासह पोलीस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे आणि पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थितीची बारकाईने पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना आरोपी आनंद भड याच्या संदर्भात अत्यंत निर्णायक पुरावे सापडले. हल्ल्यादरम्यान झालेल्या झटापटीत आरोपीचा मोबाईल फोन आणि त्याचे पाकीट घटनास्थळावरच गळून पडले होते. तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेला स्वयंपाकघरातील चाकू आणि मृत तरुणीची मोपेड पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली. घटनास्थळी सापडलेल्या मोबाईल आणि पाकिटातील कागदपत्रांमुळे संशयित आरोपीची ओळख तात्काळ पटली. आरोपीची ओळख पटल्यानंतर गुन्हे शाखेची पथके तातडीने त्याच्या मागावर रवाना करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला असता तो पळून गोंदिया येथे लपल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी जलद गतीने चक्र हलवून त्याला गोंदिया येथून बेड्या ठोकल्या. आरोपी आनंद भड हा मूळचा अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील पोही गावचा रहिवासी असून तो बी.कॉम. पदवीधर आहे. तसेच तो अमरावती येथे राहून ‘लर्निंग विथ अर्निंग’ करत होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. प्राथमिक पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी आणि आरोपी आनंद यांच्यात गेल्या सुमारे दोन वर्षांपासून ओळख होती. मात्र काही काळापूर्वी त्यांच्या नात्यात वाद निर्माण होऊन दुरावा आला होता. तरुणीने संबंध संपवण्याचा निर्णय घेतल्याने आरोपी तिच्यावर संतप्त होता. एकतर्फी प्रेमाची विकृत मानसिकता आणि ब्रेकअपच्या रागातून आरोपीने या क्रूर कृत्याची योजना आखल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाबाबत बोलताना पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी सांगितले की, घटनास्थळी आरोपीचा मोबाईल आणि इतर साहित्य पडल्याने तपासाला तात्काळ योग्य दिशा मिळाली. प्राथमिक चौकशीनुसार दोघांमध्ये दोन वर्षांपासून परिचय असल्याचे समोर आले असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्येमागील संपूर्ण पार्श्वभूमी आणि नेमके कारण आरोपीच्या सखोल पोलीस कोठडीतील चौकशीनंतरच अधिक स्पष्ट होईल. भरदिवसा शहराच्या मुख्य भागात एका विद्यार्थिनीची अशा प्रकारे निर्घृण हत्या झाल्याने महाविद्यालयीन परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून राजापेठ पोलीस या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *