स्थान: भंडारा
भंडारा : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात डॉल्बी साऊंडसह विविध उच्च क्षमतेच्या साऊंड सिस्टिमच्या वापरावर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सावन कुमार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 अंतर्गत याबाबत आदेश जारी केला आहे. हे निर्बंध 4 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12 वाजल्यापासून 1 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
डॉल्बी, प्लाझमा आणि प्रेशरमिड सिस्टिमवर प्रतिबंध
आदेशानुसार भंडारा जिल्ह्यात डॉल्बी साऊंड अर्थात टॉप, मिड आणि बेस अशा मल्टीस्पीकर सिस्टिम, प्लाझमा साऊंड सिस्टिम, प्रेशरमिड साऊंड सिस्टिम तसेच अशा प्रकारच्या साऊंड सिस्टिम वाहून नेण्यासाठी किंवा वापरण्यासाठी असलेल्या वाहनांच्या वापरावर प्रतिबंध करण्यात आला आहे.
याशिवाय या साऊंड सिस्टिमसाठी विशेषतः बदल (Modify) करण्यात आलेल्या वाहनांचाही आदेशात समावेश आहे. उत्सवांच्या कालावधीत अशा वाहनांचा वापर होऊ नये, यासाठी ती वाहने ताब्यात असलेल्या ठिकाणीच सीलबंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या उत्सवांच्या आयोजकांनाही आदेश लागू
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामध्ये दहीहंडी, पोळा, तान्हापोळा कार्यक्रमांचे आयोजक, ताजुद्दीन बाबा छब्बीसवीचे आयोजक, गणेशोत्सव व दुर्गादेवी मंडळांचे पदाधिकारी तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमांच्या आयोजकांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
या आयोजकांनी तसेच संबंधित साऊंड सिस्टिम आणि वाहनांच्या मालकांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या डॉल्बी, प्लाझमा, प्रेशरमिड व तत्सम साऊंड सिस्टिम आणि त्यासाठी वापरण्यात येणारी मॉडिफाइड वाहने स्वतःच्या ताब्यात सीलबंद ठेवावीत. आदेश लागू असलेल्या कालावधीत त्यांचा वापर किंवा उपयोग करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
जवळपास दोन महिने निर्बंध
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 4 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 1 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सावन कुमार यांनी हा आदेश जारी केला आहे.
त्यामुळे आगामी गणेशोत्सवासह विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये डॉल्बी किंवा आदेशात नमूद केलेल्या उच्च क्षमतेच्या साऊंड सिस्टिमचा वापर करण्यापूर्वी आयोजकांनी या आदेशाची गंभीर दखल घेणे आवश्यक ठरणार आहे.













Leave a Reply