लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement

चौघांच्या जाण्याने पत्रकारितेत पोकळी-राहुल पांडे

नागपूर, दि. ९ ऑगस्ट :- माणसं किती मोठी असतात.त्याची उणीव भरून काढता येत नाही. हे चौघे पत्रकारितेतील तपस्वी होते असे प्रतिपादन राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केले.

क्रांतिदिनी ९ ऑगस्ट रोजी टिळक पत्रकार भवन ट्रस्ट, नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेस क्लब, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे चार दिवंगत ज्येष्ठ पत्रकारांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संयुक्त शोकसभा आयोजित करण्यात आली. यावेळी दिवंगत पत्रकार लक्ष्मणराव जोशी, टी.बी.गोल्हर, विराग पाचपोर, मिलिंद ठेंगडी यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

राहुल पांडे पुढे म्हणाले, अलिकडे समाजात मोठी पोकळी निर्माण झाली, हे सांगताना त्यांनी काही साहित्यिकांच्या नावांचा उल्लेख केला. तसेच दिवंगत चौघा पत्रकारांच्या जिवनातील पत्रकारितेतील निवडक घटनांची माहिती दिली. यावेळी आमदार संजय भेंडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय जावंधिया, किशोर तिवारी, सुधीर पाठक, प्रफुल्ल गुढधे पाटील, प्रगती पाटील, अँड. प्रकाश मेघे आणि भालचंद्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रेस क्लब व टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली.यावेळी स्व. टी. बी. गोल्हर यांच्या कुटुंबीयांच्या वतीने त्यांच्या पत्नी श्रीमती कोकीळा गोल्हर, बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप गोल्हर आणि त्यांच्या पत्नी सौ. योगिता संदीप गोल्हर उपस्थित होत्या.
मान्यवरांनी दिवंगत पत्रकारांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचे स्मरण केले. पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे आणि लोकशाही बळकट करणारे पत्रकार त्यांच्या कार्यामुळे सदैव स्मरणात राहतात, असे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.
‘पत्रकार कधीही निवृत्त होत नाही’ या भावनेतून पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या दिवंगत ज्येष्ठ पत्रकारांची स्मृती पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा सूर शोकसभेत व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी दिवंगत पत्रकारांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांनी केले. यावेळी शोकसभेला ज्येष्ठ पत्रकार शिरीष बोरकर, ब्रह्माशंकर त्रिपाठी, विश्वास इंदूरकर, जोसेफ राव, विवेक पुराडभट, चंद्रशेखर जोशी, शेखर सोनी, डॉ. राम ठाकूर, परितोष प्रामाणिक, नितीन तोटेवार, चंद्रकांत शेंडे, रणजीत देशमुख, अरूण आसटकर, चंद्रकांत अणेकर, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अतुल पांडे, उमेश महादेवकर, ज्येष्ठ पत्रकार शिव शाहू आणि सुनील चोखारे यांच्यासह पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
👆🏼