स्थान: Nandurbar
वार्ताहर: साहिल येरने
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी-बारीपाडा येथे रस्ता आणि पुलाअभावी एका गरोदर मातेला प्रसूतीकळा सुरू असताना मध्यरात्रीच्या अंधारात सात किलोमीटर बांबूच्या झोळीतून म्हणजेच ‘बांबूलन्स’मधून वाहून नेण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फुलांती देवराम पाडवी असे या मातेचे नाव असून, मध्यरात्रीच्या सुमारास नातेवाईकांनी तिला सुकी नदीच्या पात्रातून वाट काढत मुख्य रस्त्यापर्यंत आणले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात तिची सुखरूप प्रसूती झाली. मात्र, प्रसूतीनंतर अवघ्या काही तासांतच नवजात बाळासह तिला पुन्हा त्याच बांबूच्या झोळीतून दुर्गम पाड्यावर न्यावे लागले. सातपुड्याच्या दुर्गम डोंगररांगांमध्ये वसलेल्या बारीपाडा गावातील ही हृदयद्रावक घटना ग्रामीण आणि आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव मांडणारी ठरली आहे. शनिवारी मध्यरात्री फुलांती पाडवी यांना अचानक तीव्र प्रसूतीकळा सुरू झाल्या. गावात कोणत्याही प्रकारची पक्की वाहतूक सुविधा, डांबरी रस्ता अथवा जवळून वाहणाऱ्या सुकी नदीवर पूल उपलब्ध नसल्याने कुटुंबीयांसमोर मोठा पेच निर्माण झाला. पावसाळ्याच्या दिवसांत नदी-नाल्यांना पाणी असल्याने रात्रीच्या वेळी वाहन येणे निव्वळ अशक्य होते. अशा अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीत नातेवाईकांनी वेळ न दवडता बांबू आणि चादरीच्या सहाय्याने पारंपरिक झोळी तयार केली. हातातील बॅटरीच्या मिणमिणत्या प्रकाशात, चिखल आणि पाण्याच्या दलदलीतून वाट काढत कुटुंबीयांनी मातेला झोळीत घेऊन तब्बल सात किलोमीटरची खडतर पायपीट सुरू केली. अंधाऱ्या रात्री सात किलोमीटरचा धोकादायक प्रवास पूर्ण करून नातेवाईकांनी गरोदर मातेला वेहगी गावाजवळील मुख्य रस्त्यापर्यंत आणले. तेथून एका खासगी वाहनाची तातडीने व्यवस्था करून तिला पिंपळखुटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली तिने सकाळी एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याचे समजताच कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, त्यांच्या खडतर संघर्षाचा हा प्रवास येथेच थांबला नाही. प्रसूतीनंतर दुपारी आरोग्य केंद्रातून सुट्टी मिळाल्यावर पुन्हा गावाकडे परत जाण्यासाठी तोच जुना अडथळा समोर उभा ठाकला. रस्त्याची समस्या जैसे थे असल्याने नवजात अर्भक आणि अशक्त झालेल्या मातेला पुन्हा त्याच बांबूच्या झोळीत बसवून कुटुंबीयांना सात किलोमीटरची परतीची चढण पार करावी लागली. एका बाजूला नवजात बाळ आणि दुसऱ्या बाजूला वेदनेने व्याकुळ झालेली माता असा हा प्रवास पाहून दुर्गम भागातील भीषण वास्तवाची जाणीव तीव्रतेने होते. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पट्ट्यात अशा प्रकारच्या घटना पहिल्यांदाच घडलेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वीच याच परिसरातील एका आजारी महिलेचा वेळेवर उपचार न मिळाल्याने आणि रुग्णालयात पोहोचण्याआधीच झोळीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्या घटनेचे सावट ताजे असतानाच पुन्हा एका गरोदर मातेला बाळंतपणासाठी निसर्गाशी आणि अंधाराशी झुंज द्यावी लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गणेशोत्सवाच्या काळात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना आदिवासी पाड्यांवरील माता-भगिनींना मात्र मूलभूत आरोग्यासाठी अशा प्रकारे जिवाची बाजी लावावी लागत आहे. वेहगी आणि बारीपाडा परिसरातील ग्रामस्थांनी सुकी नदीवर पूल बांधण्यासाठी तसेच वेहगी गावापर्यंत पक्का रस्ता तयार करण्यासाठी अनेकदा प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत. पावसाळ्यात ही नदी दुथडी भरून वाहत असल्याने गावाचा उर्वरित जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटतो. अशा परिस्थितीत १०८ किंवा १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका केवळ मुख्य रस्त्यापर्यंतच पोहोचू शकते. मुख्य रस्त्यापासून पाड्यापर्यंतचे अंतर पार करण्यासाठी ‘बांबूलन्स’ हाच या भागातील लोकांसाठी एकमेव आधार उरला आहे. स्वातंत्र्याची अनेक दशके उलटून गेल्यानंतरही जर आदिवासी भागातील गरोदर महिलांना प्रसूतीसाठी झोळीतून नदी पार करावी लागत असेल, तर विकास योजनांचा लाभ नेमका कोणापर्यंत पोहोचतो आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. आदिवासी उपयोजनेअंतर्गत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो, परंतु प्रत्यक्ष जमिनीवर रस्त्यांची आणि आरोग्य सुविधांची ही दुरवस्था कायम आहे. वेहगी बारीपाडा येथील या घटनेने स्थानिक लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वारंवार समोर येणाऱ्या या घटना केवळ प्रशासकीय त्रुटी नसून मानवी जगण्याच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणाऱ्या आहेत. सुकी नदीवर तातडीने पूल उभारणे आणि पाड्यांना जोडणारे बारमाही रस्ते तयार करणे हा केवळ दळणवळणाचा प्रश्न नसून तो थेट नागरिकांच्या जीवन-मरणाचा विषय बनला आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता संपूर्ण अक्कलकुवा तालुक्यातून होत आहे.















Leave a Reply