स्थान: Bhandara / mohadi
वार्ताहर: साहिल येरने
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी आणि तुमसर तालुक्यांमध्ये पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामुळे तसेच विविध किडींच्या प्रादुर्भावामुळे भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर करपून गेले आहे. ऐन बहराच्या काळात पावसाने ओढ दिल्याने आणि सिंचनाची पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसल्याने हजारो एकरांवरील धान पिवळे पडून वाळले आहे. या दुष्काळसदृश भीषण परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नुकताच बाधित शेतांच्या बांधावर जाऊन पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा संताप आणि हतबलता उघडपणे समोर आली. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या हातात करपलेल्या धानाच्या पेंड्या घेऊन पालकमंत्र्यांपुढे आपली कैफियत मांडली आणि या संकटातून सावरण्यासाठी तातडीने दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई देण्याची आर्त मागणी केली. पाहणी दौऱ्याची सुरुवात मोहाडी तालुक्याच्या सीमेवरील हिवरा गावापासून झाली. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी हिवरा येथील शेतकरी अनिल अतकरी यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन करपलेल्या धानाची पाहणी केली. यावेळी पाण्याअभावी सुकून गेलेले पीक आणि खोडकिड्यामुळे उद्ध्वस्त झालेली शेती पाहून उपस्थित शेतकरी भावूक झाले होते. सरपंच भूपेंद्र नागपासे यांनी गावातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत संपूर्ण परिसरातील खरीप हंगाम वाया गेल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी स्थानिक सरपंच संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदनही पालकमंत्र्यांना सादर करण्यात आले. या पाहणी दौऱ्यात विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके, स्थानिक आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यामध्ये भात हे मुख्य नगदी आणि अन्नधान्य पीक मानले जाते. चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने रोवणी आणि पेरणीची कामे पूर्ण केली होती. खते, बियाणे, मशागत आणि मजुरीवर शेतकऱ्यांनी हजारो रुपयांचा खर्च केला. मात्र, पीक निसवण्याच्या आणि दाणे भरण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने तब्बल महिनाभर दगा दिला. त्यातच कडक ऊन आणि रोगांच्या साथीमुळे उरलेसुरले पीकही पूर्णपणे नष्ट झाले. सिंचनाची कोणतीही पर्यायी सुविधा उपलब्ध नसलेल्या भागातील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांसमोर कर्जाची परतफेड कशी करावी आणि वर्षभराचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश यादीत भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी आणि लाखांदूर या तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, अत्यंत गंभीर परिस्थिती असूनही मोहाडी आणि तुमसर या दोन तालुक्यांना या यादीतून वगळण्यात आल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. या पार्श्वभूमीवर शासनाने अतिरिक्त तालुक्यांमध्ये किमान वीस टक्के पीक सर्वेक्षण आणि वस्तुनिष्ठ पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. हिवरा येथील पाहणीनंतर पालकमंत्र्यांच्या ताफ्याने मोहाडी तालुक्यातील कांद्री, खैरलांजी फाटा, धोप, सालई खुर्द तसेच जाम परिसरातील बाधित शेतांना भेटी दिल्या. त्यानंतर तुमसर तालुक्यातील सुकळी, देव्हाडा आणि पालोरा परिसरातील शेतांमध्ये जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, दौऱ्यादरम्यान काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेकही पाहायला मिळाला. तुमसर येथील खापा चौकात संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत हातात करपलेल्या धानाच्या पेंड्या उंचावून ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी केवळ वरवरची पाहणी न करता प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी आंदोलक करत होते. या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पाहणीअंती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी प्रशासकीय यंत्रणेला स्पष्ट निर्देश दिले. कृषी व महसूल विभागाने संयुक्तपणे तात्काळ प्रत्येक गावातील प्रत्यक्ष नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घ्यावी आणि कोणताही बाधित शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी बाळगावी, असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष पीक नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करून मोहाडी आणि तुमसर तालुक्याला आवश्यक ती शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. आता प्रशासकीय पंचनामे किती वेळेत पूर्ण होतात आणि शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी जमा होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
















Leave a Reply