लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement

एसटी बसस्थानकांवर उभारणार १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांना दिलासा

वार्ताहर: साहिल येरने

महाराष्ट्रातील लाखो महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एसटी महामंडळ आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात राज्यातील प्रमुख बसस्थानकांवर १२५ आधुनिक ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात लहान बाळांसह प्रवास करणाऱ्या स्तनदा मातांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित, स्वच्छ आणि खासगी जागा उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

मुंबई येथे पार पडलेल्या या सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक उपस्थित होते. याशिवाय टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी आणि परिवहन विभागाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील लाखो महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्रात एसटी बस हे ग्रामीण आणि निमशहरी भागातील सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रवासाचे प्रमुख साधन आहे. दररोज हजारो महिला आपल्या तान्हुल्या बाळांसह एसटीने प्रवास करतात. मात्र अनेकदा बसस्थानकांवर गर्दी असल्यामुळे किंवा योग्य जागा उपलब्ध नसल्यामुळे स्तनदा मातांना बाळाला स्तनपान करताना आणि त्यांची निगा राखताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्येचे गांभीर्य ओळखून एसटी प्रशासनाने महिलांच्या गोपनीयतेचा आणि सन्मानाचा आदर राखण्यासाठी बसस्थानकांवर हिरकणी कक्ष सुरू करण्याचा निर्णय अधिक व्यापक स्तरावर राबवण्यास सुरुवात केली आहे.

हा संपूर्ण प्रकल्प टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सीएसआर निधीतून राबवला जाणार आहे. त्यामुळे या १२५ कक्षांच्या उभारणीसाठी एसटी महामंडळावर कोणताही थेट आर्थिक भार पडणार नाही. या प्रकल्पाची अंमलबजावणी पुढील तीन आर्थिक वर्षांत टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वर्ष २०२६-२७ मध्ये ५० कक्ष उभारले जातील. त्यानंतर वर्ष २०२७-२८ मध्ये ५० कक्ष आणि तिसऱ्या टप्प्यात वर्ष २०२८-२९ मध्ये उर्वरित २५ कक्ष अशा प्रकारे एकूण १२५ हिरकणी कक्ष राज्यातील विविध विभागांतील गर्दीच्या आणि महत्त्वाच्या बसस्थानकांवर स्थापित करण्यात येतील.

या हिरकणी कक्षांची रचना अत्यंत आधुनिक आणि महिलांच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. हे कक्ष अंदाजे ३ मीटर बाय ३ मीटर आकाराचे सुसज्ज प्री-फॅब्रिकेटेड युनिट्स असतील. या कक्षांमध्ये महिलांसाठी आरामदायी बसण्याची सोय, बाळाला स्तनपान करण्यासाठी विशेष फीडिंग टेबल, डायपर बदलण्यासाठी स्वच्छ जागा, सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन आणि त्यांच्या विल्हेवाटीसाठी इन्सिनरेटर किंवा डिस्पोझल यंत्रणा उपलब्ध असेल. तसेच कक्षात उत्तम प्रकाश व्यवस्था, योग्य व्हेंटिलेशन आणि पंख्यांची सोय करण्यात येणार आहे, ज्यामुळे माता व बाळाला तेथे सुरक्षित व प्रसन्न वातावरण मिळेल.

या सामंजस्य करारानुसार एसटी महामंडळ या प्रकल्पासाठी बसस्थानकांवर आवश्यक असलेली सुमारे ५ बाय ५ मीटरची मोकळी जागा, सुरळीत वीज आणि पाणीपुरवठा उपलब्ध करून देणार आहे. या कक्षांची दैनंदिन स्वच्छता, सुरक्षा आणि नियमित देखभाल व दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी एसटी प्रशासनावर असेल. बसस्थानकावरील महिला सुरक्षारक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे कक्ष २४ तास सुरक्षित आणि स्वच्छ ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या प्रकल्पाविषयी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, बसस्थानकांवर स्तनदा मातांसाठी स्वतंत्र, स्वच्छ आणि खासगी जागा उपलब्ध करून देणे हे त्यांच्या सन्मान, सुरक्षितता आणि आरोग्याच्या दृष्टीने उचललेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. हिरकणी कक्ष ही केवळ आणखी एक प्रवासी सुविधा नसून, महिलांच्या विशिष्ट गरजांची संवेदनशीलतेने दखल घेऊन एसटी सेवेला अधिक प्रवासी-केंद्री बनवण्याचा शासनाचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

गेल्या काही वर्षांत एसटी महामंडळाने महिला प्रवाशांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. यामध्ये महिलांना प्रवासात देण्यात आलेली सवलत आणि सुरक्षिततेसाठी राबवण्यात येणारे उपक्रम यांचा समावेश आहे. आता आधुनिक हिरकणी कक्षांच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मातृत्व आणि बालसंगोपनाला सन्मान देणारा नवा पायंडा एसटीने पाडला आहे. कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहकार्यातून सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक पायाभूत सुविधांचा दर्जा कसा उंचावता येतो, याचे हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे. या निर्णयामुळे प्रवासादरम्यान मातांची होणारी गैरसोय कायमस्वरूपी दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *