लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement

नागपुरात दोन धक्कादायक घटना: पित्यासह एका संशयित आरोपीचा मृत्यू

स्थान: Lokhit newsroom

वार्ताहर: साहिल येरने

उपराजधानी नागपूर शहरात एकाच रात्री घडलेल्या दोन स्वतंत्र आणि अत्यंत खळबळजनक घटनांमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. एका घटनेत दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या जन्मदात्या पित्याचा अल्पवयीन मुलीने स्वसंरक्षणार्थ केलेल्या प्रतिकारात मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत नऊ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून संतप्त स्थानिक जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत एका संशयित आरोपीचा जीव गेला. एमआयडीसी आणि पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या दोन्ही गंभीर घटनांमुळे शहरात प्रचंड तणावाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करून सखोल तपास सुरू केला आहे. पहिली घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुजन नगर झोपडपट्टी परिसरात सोमवारी रात्री घडली. मृत व्यक्तीचे नाव जयपाल बारेलाल खोलपिटणे (वय ४५ वर्षे) असून तो मजुरीची कामे करत होता. त्याच्या पश्चात पत्नी, १७ वर्षांची मुलगी आणि १४ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. संबंधित मुलगी बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे, तर तिची आई परिसरातील घरांमध्ये धुणीभांडीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत जयपाल याला दारूचे तीव्र व्यसन होते आणि त्यावरून घरात सातत्याने वादविवाद होत असत. सोमवारी रात्री पावणेनऊ ते नऊच्या सुमारास तो दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळी त्याची पत्नी कामावर गेलेली असल्याने १७ वर्षांची मुलगी घरात एकटीच होती. नशेत असलेल्या पित्याने आपल्याच मुलीशी गैरवर्तन करत तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकाराने घाबरलेल्या मुलीने त्याला तीव्र विरोध दर्शवला आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पित्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. स्वतःच्या अब्रूचे आणि जिवाचे रक्षण करण्यासाठी अल्पवयीन मुलीने घरात असलेली तिच्या भावाची लाकडी क्रिकेट बॅट उचलली आणि वडिलांच्या डोक्यावर प्रहार केला. या जोरदार फटक्यामुळे तो रक्तबंबाळ होऊन फरशीवर कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रात्री उशिरा आई काम आटोपून घरी परतल्यानंतर घाबरलेल्या मुलीने घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला. यानंतर मुलीने स्वतः मध्यरात्रीच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश सिंगारेड्डी, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा, सहायक पोलीस आयुक्त वैभव जाधव, सहायक पोलीस आयुक्त यशवंत नलावडे आणि संबंधित ठाणेदारांसह मोठा पोलीस ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या जयपाल याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले असून बाल न्याय कायद्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, दुसरी घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच रात्री घडली. पारडी परिसरातील एका नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार अथवा अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आला. या प्रकरणात संशयित असलेला नारायणदास वैष्णव (मूळ रा. भिलाई, छत्तीसगड; सध्या रा. पारडी, नागपूर) याने घराबाहेर खेळणाऱ्या चिमुरडीला आमिष दाखवून आपल्या घरात नेऊन गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या आणि कुटुंबीयांच्या लक्षात येताच परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली. संतप्त जमावाने संशयिताला पकडून जाब विचारला असता वातावरण अधिकच तापले आणि जमावाने त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाच्या मारहाणीत संशयित नारायणदास गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पारडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संतप्त जमावाच्या तावडीतून जखमी व्यक्तीची सुटका केली. त्याला तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अंतर्गत आणि डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतींमुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पारडी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता, परंतु पोलिसांनी वेळीच अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात जमावाविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एकाच रात्री नागपूरच्या दोन वेगवेगळ्या भागांत घडलेल्या या घटनांमुळे सामाजिक आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका बाजूला चार भिंतींच्या आत स्वतःच्याच पित्याकडून होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध अल्पवयीन मुलीने स्वसंरक्षणासाठी उचललेले टोकाचे पाऊल कौटुंबिक अधोगती दर्शवणारे आहे, तर दुसऱ्या बाजूला कायद्याचा धाक न बाळगता जमावाने कायदा हातात घेऊन संशयिताची केलेली हत्या ही झुंडशाहीची भीषण वास्तवता समोर आणते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, दोन्ही घटनांचा निष्पक्षपणे आणि कायदेशीर चौकटीत राहून तपास केला जात आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.