लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement

पिंपरी-चिंचवडमध्ये वायसीएम संलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करा: आमदार महेश लांडगे

स्थान: Pune

वार्ताहर: साहिल येरने

पिंपरी-चिंचवड शहराचा वेगाने होत असलेला विस्तार, सुमारे चाळीस लाखांच्या घरात पोहोचलेली लोकसंख्या आणि सातत्याने वाढणाऱ्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाशी संलग्न शासकीय किंवा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे हक्काचे एमबीबीएस वैद्यकीय महाविद्यालय तातडीने सुरू करावे, अशी आग्रही मागणी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र पाठवले असून, राज्य शासनाने या महत्त्वाच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक प्रकल्पाला लवकरात लवकर तत्त्वतः मान्यता द्यावी, अशी विनंती केली आहे.

पिंपरी-चिंचवड हे देशातील एक प्रमुख औद्योगिक आणि वेगाने विकसित होणारे नागरी केंद्र आहे. उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधींमुळे देशभरातून नागरिक येथे स्थायिक झाले आहेत. सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम (MD / MS) चालवले जात आहेत. मात्र, एवढी मोठी लोकसंख्या, आधुनिक पायाभूत सुविधा आणि दररोज हजारो रुग्णांची ये-जा असतानाही शहरात स्वतंत्र शासकीय अथवा महापालिकेचे एमबीबीएस पदवी महाविद्यालय अस्तित्वात नाही. त्यामुळे पदवी स्तरावरील वैद्यकीय शिक्षणासाठी स्थानिक विद्यार्थ्यांना पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, राज्यातील इतर जिल्हे अथवा परराज्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.

आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, वैद्यकीय शिक्षणाचा वाढता विस्तार लक्षात घेता शासनाने वायसीएम संलग्न एमबीबीएस महाविद्यालयास मंजुरी देणे आवश्यक आहे. यासाठी लागणारी जागा, आवश्यक निधी आणि अध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि संबंधित वैद्यकीय शिक्षण विभागाकडून एका निश्चित मुदतीत कालबद्ध प्रस्ताव मागवून घेण्यात यावा. प्रशासकीय पातळीवर सर्व बाबींची पडताळणी वेळेत पूर्ण झाल्यास शहरात वैद्यकीय शिक्षणाचे नवे दालन सुरू होण्याचा मार्ग सुकर होईल.

शहरातील सर्वसामान्य, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील गुणवंत विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी येणाऱ्या प्रचंड खर्चाचा मुद्दाही या मागणीमागे अत्यंत महत्त्वाचा ठरतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशाच्या जागा मर्यादित असल्याने अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा पर्याय निवडावा लागतो. मात्र, खासगी महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क सर्वसामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर असते. जर पिंपरी-चिंचवडमध्ये शासकीय किंवा महापालिकेचे स्वतःचे एमबीबीएस महाविद्यालय सुरू झाले, तर स्थानिक आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्यंत माफक व परवडणाऱ्या शुल्कात उच्च दर्जाचे दर्जेदार वैद्यकीय शिक्षण घेणे शक्य होणार आहे.

वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा थेट आणि सकारात्मक परिणाम शहराच्या सार्वजनिक आरोग्य सेवेवरही होणार आहे. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालय हे परिसरातील सर्वात मोठे रुग्णालय असून, तेथे केवळ पिंपरी-चिंचवडमधूनच नव्हे तर मावळ, खेड, जुन्नर आणि शिरूर या लगतच्या ग्रामीण भागातूनही दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयाशी एमबीबीएस महाविद्यालय जोडले गेल्यास मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर, निवासी डॉक्टर आणि प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्यामुळे रुग्णालयातील उपचारांचा दर्जा अधिक उंचावेल, अतिदक्षता आणि गुंतागुंतीच्या आजारांवर तिथेच उपचार मिळतील आणि ससून किंवा इतर मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना केली जात असताना, पिंपरी-चिंचवडसारख्या आर्थिकदृष्ट्या सक्षम महानगरपालिकेमध्ये सर्व आधुनिक सुविधांयुक्त महाविद्यालय उभारणे सहज शक्य आहे. वायसीएम रुग्णालयातील उपलब्ध जागा, रुग्णांची मोठी संख्या आणि विद्यमान पायाभूत सुविधा यामुळे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) मानकांची पूर्तता करणे प्रशासनाला अधिक सोपे जाईल. त्यामुळे शासनाने या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ पावले उचलावीत, असा सूर उमटत आहे.

पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांचे सक्षमीकरण करणे ही काळाची गरज आहे. आमदार महेश लांडगे यांनी मांडलेल्या या मागणीमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील जुनी मागणी पुन्हा एकदा चर्चेत आली असून, आता राज्य शासन आणि महापालिका प्रशासन यावर काय धोरणात्मक निर्णय घेते, याकडे संपूर्ण शहरवासीयांचे आणि वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *