लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement

रानभाजी विक्री महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद*

२ लाख ८०० रुपयांची विक्री

नागपूर, दि. १३: जागतिक आदिवासी दिनानिमित्त कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नागपूर व कृषी विभाग नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी व सेंद्रीय उत्पादन विक्री महोत्सवाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कृषि राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्या प्रेरणेने दिनांक १३ व १४ ऑगस्ट रोजी रामनगर मैदान, नागपूर येथे आयोजित या दोन दिवसीय जिल्हास्तरीय रानभाजी व सेंद्रीय उत्पादन विक्री महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मा.श्री कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी रानभाजी व सेंद्रिय उत्पादनांची दोन लाख ८०० रुपयांची विक्री झाली.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी विविध नैसर्गिक शेतमाल व रानभाजी उत्पादक शेतकरी गटांच्या स्टॉलला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी शेतकरी गटांना प्रोत्साहन देत सेंद्रिय शेती, स्थानिक रानभाज्या आणि पारंपरिक अन्नपद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले.

याप्रसंगी जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार श्विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. आत्मा नागपूरच्या प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर श्रीमती प्रज्ञा गोळघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध शेतकरी गटांनी रानभाज्या, नैसर्गिक शेतीमाल, भाजीपाला व अन्य कृषी उत्पादने महोत्सवात विक्रीसाठी आणली होती.

महोत्सवातील विशेष आकर्षण ठरलेल्या रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे पौष्टिक गुणधर्म, पारंपरिक उपयोग आणि दैनंदिन आहारातील स्थान याबाबत ६५ शेतकरी गटांनी नागपूर शहरातील नागरिकांशी थेट संवाद साधला. ग्रामीण भागातील शेतकरी आणि शहरातील ग्राहक यांच्यात थेट संपर्क निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *