लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement

एक देश, एक निवडणूक : गोंदिया युथ पार्लमेंटमध्ये लोकशाही आणि प्रतिनिधित्वावर विद्यार्थ्यांची चर्चा

स्थान: गोंदिया

गोंदिया : ‘एक देश, एक निवडणूक’ ही संकल्पना देशासाठी आवश्यक असली, तरी तिच्या अंमलबजावणीत लोकशाही अधिक सशक्त राहणे, सर्व स्तरांतील नागरिकांचे प्रतिनिधित्व कायम राखणे आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे, असा विचार गोंदिया येथे आयोजित जिल्हास्तरीय युथ पार्लमेंटमध्ये मांडण्यात आला. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी या विषयावर आपली मते व्यक्त करत निवडणूक सुधारणांच्या विविध पैलूंवर चर्चा केली.

युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत मेरा युवा भारत, गोंदिया यांच्या वतीने एस. एस. गर्ल्स महाविद्यालयात या युथ पार्लमेंटचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची माहिती विभागाचे उपसंचालक सौरभ कुमार निषाद यांनी दिली.

निवडणूक खर्च आणि लोकशाही प्रतिनिधित्वावर चर्चा

विद्यार्थ्यांनी ‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पनेचे संभाव्य फायदे आणि अंमलबजावणीतील आव्हाने यावर विचार मांडले. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे खर्च होणारा वेळ, पैसा आणि मनुष्यबळ वाचविण्यासाठी ही संकल्पना उपयुक्त ठरू शकते, असे मत व्यक्त करण्यात आले.

मात्र, निवडणूक प्रक्रिया एकत्रित करताना लोकशाहीतील सर्व घटकांचे महत्त्व आणि नागरिकांचे प्रतिनिधित्व अबाधित राहणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले. यासाठी संविधानात आवश्यक त्या सुधारणा नियमानुसार व्हाव्यात, अशी भूमिकाही चर्चेत मांडण्यात आली.

युवकांना ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश शुक्ला यांनी युवकांना आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक राहून सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. इच्छित ध्येय साध्य होईपर्यंत प्रयत्नशील राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमुख अतिथी सालेकसा येथील अग्रवाल महाविद्यालयाचे प्राचार्य एस. नारायण मूर्ती यांनी विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयाचा सखोल अभ्यास करून आपली मते प्रभावीपणे मांडावीत, असे सांगितले. तसेच मताधिकाराचे महत्त्व ओळखण्याचे आवाहन केले. एस. एस. गर्ल्स महाविद्यालयाच्या प्राचार्य शारदा महाजन यांनी विविध भागांतून सहभागी झालेल्या युवक-युवतींचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. युवकांना विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारच्या उपक्रमाचे कौतुक केले.

परीक्षकांकडून सादरीकरणाबाबत मार्गदर्शन

स्पर्धेसाठी जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर, राजीव गांधी सोशल वर्कर कॉलेजच्या संगीता घोष, माजी प्राध्यापिका दीप्ती चौरागडे, कंटेंट क्रिएटर राहुल वर्मा आणि ब्रिजेश गजभिये यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील त्रुटी निदर्शनास आणून देत विषय अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक मुद्द्यांबाबत मार्गदर्शन केले. प्रा. दीप्ती चौरागडे यांनी ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाची सद्यस्थिती स्पष्ट केली. हे विधेयक लोकसभेच्या संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) विचाराधीन असून त्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच विधेयकांच्या शासनस्तरीय प्रक्रियेतील विविध टप्प्यांविषयी वस्तुनिष्ठ माहिती दिली.

युवकांसाठी करिअर आणि कौशल्य विकासाचे मार्गदर्शन

कंटेंट क्रिएटर राहुल वर्मा यांनी स्वतःच्या प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. युवकांनी स्वतःमधील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य दिशा दिल्यास करिअरच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

संगीता घोष यांनी जिल्हास्तरीय निकाल जाहीर करत निवडून न आलेल्या विद्यार्थ्यांनीही चांगला प्रयत्न केल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एस. एस. गर्ल्स महाविद्यालयाच्या ईश्वरी खटवानी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. राजश्री वाघ यांनी केले, तर आभार प्रा. दिशा गेडाम यांनी मानले. कार्यक्रमात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *