लोकहित न्यूज़ 24

जनसमान्यांच्या हितासाठी

Advertisement

लाखनीत ‘स्कूल ठीक करो’ अभियान; जिल्हा परिषद शाळांची होणार प्रत्यक्ष पाहणी

लाखनी : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून विविध समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज बहुजन युवा संघटना, तालुका लाखनी यांच्या वतीने ‘स्कूल ठीक करो’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद भंडारा यांना निवेदन सादर केले.

या अभियानांतर्गत लाखनी तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांना संघटनेचे पदाधिकारी व सदस्य प्रत्यक्ष भेटी देणार आहेत. यावेळी शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षक-विद्यार्थी संवाद, वर्गखोल्यांची स्थिती, शैक्षणिक साहित्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय, वीज तसेच इतर आवश्यक भौतिक सुविधांची पाहणी करण्यात येणार आहे.

तसेच शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या जाणार आहेत. पाहणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटी व आवश्यक बाबी संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे संघटनेने सांगितले.

‘गुणवत्तापूर्ण शिक्षण — विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल’ या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच आवश्यक शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संघटना प्रयत्नशील राहणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अभियानादरम्यान जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी संघटनेच्या प्रतिनिधींना आवश्यक सहकार्य करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रविण कोचे, कार्याध्यक्ष अमित रामटेके, उपाध्यक्ष विशाल जांभुळकर व सचिन रामटेके, महासचिव अंकित बडोले, सचिव राहुल कांबळे, सहसचिव मोहित शहारे, दत्तू भैसारे, राकेश मेश्राम, कोषाध्यक्ष अक्षय मेश्राम, प्रसिद्धी प्रमुख शुभम जांभुळकर, रोशन खोब्रागडे, मुख्य मार्गदर्शक धीरज गोस्वामी, कविराज गजभिये यांच्यासह सदस्य साजन भैसारे, समीर कोटंगले, हरीश खेडीकर, निलेश दिघोरे, डेविड जांभुळकर, वैभव नंदेश्वर, पूर्वेश बावणे, प्रवीण रामटेके, विजय रंगारी, रक्षित कांबळे, राकेश सांगोळे, सौरभ मेश्राम व सुहास मेश्राम उपस्थित होते.

‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून लाखनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आणि शाळांमधील आवश्यक सुविधांचा प्रश्न प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार आहे. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाबींवर प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *