स्थान: Lokhit newsroom
वार्ताहर: साहिल येरने
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात धान पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही प्रशासनाकडून वेळेत मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधील असंतोष आता उफाळून आला आहे. तालुक्यातील सितेपार येथील संतप्त शेतकऱ्यांनी सरसकट दुष्काळी मदत आणि विविध शासकीय सवलती मिळाव्यात या प्रमुख मागणीसाठी तुमसर तहसील कार्यालयावर धडक दिली. मात्र, कार्यालयात पोहोचल्यानंतर तहसीलदार, नायब तहसीलदार अथवा उपविभागीय अधिकारी यांपैकी एकही जबाबदार महसूल अधिकारी उपस्थित नसल्याचे समोर आले. यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. प्रशासकीय अनास्थेचा निषेध करत कोणत्याही जाचक अटींशिवाय संपूर्ण तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी लावून धरली.
तुमसर आणि मोहाडी परिसर हा विदर्भातील प्रमुख भात उत्पादक पट्टा मानला जातो. चालू खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा तडाखा या भागातील भातशेतीला बसला आहे. सुरुवातीला पावसाचा पडलेला मोठा खंड आणि त्यानंतर बदलत्या हवामानामुळे धानपिकांवर मावा व तुडतुड्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी पदरमोड करून महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली, तसेच इतर नैसर्गिक संकटांशी झुंज देत उभे पीक वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, या रोगांमुळे भाताचे उत्पादन अत्यंत नगण्य पातळीवर आले असून शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघणे कठीण झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत संपूर्ण तुमसर तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या या भीषण संकटाच्या काळात महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे वैयक्तिक पंचनामे करण्याचा आग्रह धरला जात आहे. प्रशासनाच्या या भूमिकेवर शेतकऱ्यांचा तीव्र आक्षेप आहे. वैयक्तिक पंचनाम्यांची पद्धत अत्यंत किचकट आणि वेळखाऊ असून, यामुळे गावागावांमध्ये शेतकऱ्यांमध्ये आपापसात मतभेद आणि वाद निर्माण होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रत्यक्ष पाहणीसाठी महसूल, कृषी तसेच ग्रामविकास विभागाचे कर्मचारी वेळेवर शेताच्या बांधावर उपलब्ध होत नाहीत. शासनाकडून दुष्काळी मदतीची केवळ आश्वासने दिली जातात, परंतु प्रत्यक्ष मदतीसाठी वैयक्तिक पंचनाम्यांचा प्रपंच का मांडला जातो, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे कोणतीही अट न ठेवता संपूर्ण तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, ही मागणी जोर धरत आहे.
आपल्या या न्याय्य मागण्यांचे निवेदन देण्यासाठी सितेपार ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती बन्सोड, उपसरपंच जागेश्वर सार्वे यांच्या नेतृत्वाखाली आशिष कोरडे, शामलाल रेखाटे, हरिलाल ईसार, सचिन भोंगाडे, दशरथ ईसार, गिरीश क्षीरसागर, सचिन भोयर यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी एकत्र येत तहसील कार्यालयात पोहोचले होते. शेतकऱ्यांची अपेक्षा होती की वरिष्ठ अधिकारी त्यांच्या व्यथा ऐकून घेतील आणि शासनाकडे योग्य पाठपुरावा करतील. मात्र, प्रमुख अधिकारी गैरहजर असल्याने ‘अधिकारी बांधावर आणि शेतकरी कार्यालयाच्या दारात’ अशी उपरोधिक व विदारक स्थिती निर्माण झाल्याची भावना आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
आंदोलनादरम्यान सितेपारचे उपसरपंच जागेश्वर सार्वे यांनी महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री व वरिष्ठ स्तरावरून पंचनामे ही केवळ औपचारिकता असल्याचे आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाईल असे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर पंचनाम्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासकीय कर्मचारी बांधावर पोहोचत नसताना शेतकरी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. जर संपूर्ण परिसरच कीड आणि दुष्काळाने बाधित झाला असेल, तर सरसकट दुष्काळ जाहीर करण्यास अडचण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रशासनाने केवळ मदतीचा देखावा न करता बळीराजाला थेट दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर तुमसरचे तहसीलदार उपेश अंबादे यांनी आपली बाजू मांडली. आपण सध्या दुष्काळ पाहणी आणि इतर महत्त्वाच्या शासकीय कामकाजानिमित्त क्षेत्रीय दौऱ्यावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयातील संबंधित लिपिक कडव यांच्याकडे सोपवावे, प्राप्त निवेदनावर नियमानुसार आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही निश्चितपणे केली जाईल, असा निरोप त्यांनी दिला. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिपिकाकडे निवेदन देण्यास स्पष्ट नकार दिला.
आपल्या मागण्या थेट जबाबदार अधिकाऱ्यांसमोर मांडता न आल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी अखेर निवेदन न देताच तहसील कार्यालयातून माघार घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे की, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे गांभीर्य ओळखून शासनाने संपूर्ण तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ आर्थिक मदत वितरित करावी. जर शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेतली गेली नाही, तर सितेपारसह परिसरातील सर्व गावांतील शेतकरी एकत्र येऊन तुमसर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढतील. या आंदोलनामुळे तुमसर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि प्रशासकीय समन्वयाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.















Leave a Reply