info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  21 Oct 2022

बालविवाह लावाल तर दोन वर्षाचा कारावास-जिल्हाधिकारी


- ग्रामसेवक, पुरोहीत, फोटोग्राफर व आचारीही जबाबदार
नागपूर दि.21 : मुलाचे वय 21 व मुलीचे वय 18 पेक्षा कमी असणाऱ्या लग्न समारंभासाठी यापुढे ग्रामसेवक, पुरोहित (सर्व धर्माचे ) फोटोग्राफर, आचारी, केटरर्स, यांच्यासह लग्नात उपस्थित असणारा प्रत्येक पाहुणा,माता पिता सर्वच जबाबदार असतील.हे सर्व दोन वर्षाच्या सश्रम कारावासास पात्र असतील. त्यामुळे शासनाचे कान -डोळे होऊन या सर्वांनी असा विवाह हाणून पाडावा,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

      जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी  या संदर्भात एक आदेश काढले आहेत. शासनाने बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 सुधारित दिनांक 13 जुलै 2016 च्या प्रभावी अंमलबजावणी बाबत सूचना केल्या आहेत. नागपूर जिल्ह्यात या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आज पोलीस आयुक्त, नागपूर शहर, पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्यामार्फत या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.
      जिल्ह्यातील सर्व गावातील ग्रामसेवकासोबतच लग्न लावून देणारे पंडित (सर्व धर्माचे) प्रिंटिंग प्रेसचे प्रिंटर्स, मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर, फोटोग्राफर, आचारी, मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक, लग्नात उपस्थित असणारे वऱ्हाडी या सर्वांना यापुढे आपल्याला काय कराव लागते अशी भूमिका घेता येणार नाही. या सर्वांच्या समक्ष बालविवाह होत असेल तर शासनाच्या निर्देशास आणून द्यावे. तसेच अशा कृतीस प्रतिबंध करावा. अन्यथा या घटनाक्रमात सहभागी म्हणून दोन वर्षाची शिक्षा होऊ शकते व एक लक्ष रुपयापर्यंत दंडास पात्र असू शकतात असेही या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे विवाहासंबंधित सर्व नागरिक, व्यावसायिक संस्था, यांनी विवाह अथवा विवाह संबंधित कामकाज करताना विवाह करणाऱ्या व्यक्ती हे कायद्यानुसार सज्ञान असल्याची खातरजमा करूनच विवाह संबंधित कामे करावीत, असे निर्देश देण्यात आले आहे.