info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  23 Aug 2023

फडणवीसांचा जपानमध्ये तिसरा दिवस व्यस्ततेचा*



- *दिवसभराच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चांद्रयानाच्या यशाचा भारतीयांसोबत आनंद साजरा*


टोकियो, दि.23- 
जपान दौऱ्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या आणि दिवसभराच्या घडामोडी संपत असताना भारताने चंद्रावर पाऊल ठेवले, तो क्षण जपानमधील भारतीयांसोबत आनंदाने साजरा केला. वंदे मातरम् आणि भारत माता की जयच्या घोषणांनी आज संपूर्ण जपान निनादले होते. या आनंदाच्या आणि ऐतिहासिक क्षणाला संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी पहिली बैठक इस्ट जपान रेल्वे कंपनी, जेआर इस्टचे अध्यक्ष आणि सीईओ यूजी फुकासावा यांच्यासमवेत झाली. कंपनीचे अन्य अधिकारी इकुजू असामी आणि तकेशी त्सुयोशी हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेआर इस्टच्या मुख्यालयाला भेटीमुळे आम्ही उत्साहित आहोत. जपानचे माजी पंतप्रधान स्व. शिंझो ॲबे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारतात बुलेट ट्रेनची पायाभरणी केली आणि भारत-जपान मैत्रीचा एक नवा अध्याय लिहिला गेला. अतिशय गतीने हे काम सुरू असून टाईमलाईन्स पाळल्या जात आहेत. 2020 नंतर ज्या अडचणी आल्या, त्या आता सोडविल्या गेल्या आहेत आणि संपूर्ण गतीने काम केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतात रस्ते, रेल्वेचे काम मोठ्या प्रमाणात  होत असून 500 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. भारतात वंदे भारत रेल्वेचे जाळे सुद्धा आता निर्माण झाले असून त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रवासाची गती विकास आणि अर्थव्यवस्थेची गती वाढविते. बुलेट ट्रेन माध्यमातून महाराष्ट्र आणि गुजरातच्या अर्थकारणाला मोठी गती प्राप्त होणार आहे. भारतात केवळ एक बुलेट ट्रेन करून थांबू नये, तर अधिक बुलेट ट्रेन सुरु व्हाव्यात,  अशी आमची इच्छा आहे.

*शिनकॅन्सेन नियंत्रण कक्षाला भेट*
जपानचे बुलेट ट्रेनचे जाळे शिनकॅन्सेन नावाने ओळखले जाते. या सेवेबद्दल जपानच्या नागरिकांमध्ये विशेष भावना आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या शिनकॅन्सेन नियंत्रण कक्षाला भेट दिली. या ठिकाणी एकूण 7 विभाग असून 190 लोक 24*7 या सेवेवर देखरेख ठेवत असतात. भारतात मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन धावणार असून त्याची प्रवासी क्षमता बोईंगपेक्षा तिप्पट असणार आहे. 

*जपानचे मंत्री निशिदा शोजी यांच्यासमवेत भेट*
जपानचे लॅंड, पायाभूत सुविधा, वाहतूक उपमंत्री निशिदा शोजी यांचीही आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. बुलेट ट्रेन स्थानकाबाहेर होणाऱ्या विकास प्रकल्पांना जायकाच्या माध्यमातून वित्तसहाय्य करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जातोय, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. महामार्ग आणि स्टील पॅनल रोड संदर्भातील तंत्रज्ञान देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी त्यांच्याशी चर्चा करताना म्हणाले की, डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन (डीएफसी) माध्यमातून औद्योगिक पार्क आणि बंदरे यांची एक नवी इकोसिस्टम तयार होते आहे, तर हायस्पीड रेल्वेच्या माध्यमातून अनेक नवीन संधी निर्माण होत आहेत. सुपा येथे जापनीज इंडस्ट्रियल टाऊनशिप तयार होते आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक विकासाचे एक मोठे क्षेत्र निर्माण होणार आहे. 

*जपानचे मंत्री टकागी केई यांची भेट*
जपानचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री टकागी केई यांची सुद्धा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. केई यांनी अलीकडेच जी-20 परिषदेसाठी महाराष्ट्र आणि गोव्याच्या प्रवासाचे अनुभव कथन केले. भारताने आर्थिक आणि विशेषतः ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. गेल्या दौऱ्यात कमी वेळ मिळाल्याने येणाऱ्या काळात मुंबईला भेट देणार आहे. मुंबई हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे केंद्र आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्रासोबत आणखी सहकार्य वाढविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. देशाची आर्थिक, व्यावसायिक आणि करमणूक राजधानी आहे. भारत आणि जपान अधिक सहकार्याने मोठा बदल घडून येऊ शकतो. राज्यातील अनेक प्रकल्पांना जायका अर्थसहाय्य करीत आहे. वर्सोवा-विरार सी-लिंक प्रकल्पाला सुद्धा अर्थसहाय्य मिळण्यासाठी भारत आणि जपान सरकार चर्चा करीत आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, अशी पूर्ण आशा आहे.

*जेट्रोसमवेत भेट आणि चर्चा*
जेट्रोचे अध्यक्ष नोरिहिको इशिगुरो यांची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी कार्यकारी उपाध्यक्ष काझुया नाकाजो आणि संचालक मुनेनोरी मात्सुंगा हे सुद्धा उपस्थित होते. जपानमधील स्टार्टअपला मदत करतानाच भारतातील स्टार्टअपला मदत करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. सुपा येथे जपानमधील 4 गुंतवणूकदार येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2015 पासून आम्ही जेट्रोच्या संपर्कात आहोत. जपानच्या अधिकाधिक कंपन्यांनी महाराष्ट्रात यावे, ही आमची इच्छा आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सर्व सुविधा राज्य सरकार उपलब्ध करून देत आहे. यासाठीची प्रक्रिया पारदर्शी करण्यात आली आहे. जपानमधील नवनवीन तंत्रज्ञानाचे महाराष्ट्रात स्वागत आहे.

*निप्पॅान लाईफ इन्शुरन्ससोबत चर्चा *
निप्पॅान लाईफ इन्शुरन्सचे संचालक मिनोरू किमुरा, महाव्यवस्थापक हिरोकी यामाऊचि, संदीप सिक्का यांच्याशी सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चर्चा केली. निप्पॅान लाईफ इन्शुरन्स ही भारतातील सर्वात मोठी वित्तीय व्यवस्थापन आणि विमा सेवा देणारी कंपनी आहे. सुमारे 12,000 कोटी रुपये विदेशी गुंतवणूक त्यांनी भारतात केली आहे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एमएमआरडीए जेव्हा निप्पॅान लाईफ इन्शुरन्सकडून निधी घेईल, तेव्हा त्याला राज्य सरकारची हमी असेल. किमान 2 ते 3 प्रकल्प आम्ही निप्पॅान लाईफ इन्शुरन्ससोबत करणार आहोत.

*टोकियोतील दूतावासात भारतीयांशी संवाद *
टोकियोतील दूतावासात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भारतीयांशी संवाद साधला. जपानमध्ये सुमारे 1500 भारतीय व्यावसायिक आहेत. देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले की, मराठी समुदायाने ज्या पद्धतीने स्वागत केले, त्यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आज महाराष्ट्र भारताचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करीत आहे. 15% जीडीपी, 20% निर्यात आणि सुमारे 30% विदेशी गुंतवणूक ही महाराष्ट्राची बलस्थानं आहेत. देशातील सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प महाराष्ट्रात आज होत आहेत. त्यात समृद्धी महामार्ग सुद्धा आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे ठामपणे महाराष्ट्राच्या मागे उभे आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्प जरी 2028 पर्यंत पूर्ण होणार असला तरी 2027 पर्यंत त्याचे उदघाटन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेव्हा तुम्ही भारतात याल, तेव्हा वंदे भारत रेल्वेने प्रवास निश्चितपणे करा. आज भारत चंद्रावर पाऊल ठेवत आहे, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.