विकास योजना तळागाळापर्यंत पोहोचविणार स्वयंसहायता युवा गट
विकास योजना तळागाळापर्यंत
पोहोचविणार स्वयंसहायता युवा गट
- विभागात 506 युवा गटाद्वारे 5 हजाराहून अधिक युवक जोडले
नागपूर दि. 03 :- स्मार्ट मोबाईलच्या युगात अजूनही शासकीय कल्याणकारी योजना या गरजवंतापर्यंत पाहिजे तितक्या प्रमाणात पोहोचत नाहीत. त्यामुळे योजनांचा मूळ उद्देश सफल होत नाही, हीच बाब लक्षात घेऊन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी 18 ते 45 वयोगटातील समाजकार्याची आवड असणाऱ्या युवक-युवतींना घेऊन स्वयंसहायता युवा गटांची निर्मिती केली आहे.
राज्यात आतापर्यंत 1656 युवा गटांची स्थापना करण्यात आली۔ त्याद्वारे साधारणता 12 हजार 505 युवक-युवती जोडले गेलेत. अशा पद्धतीने प्रथमच युवकांचा सहभाग करून शासकीय योजनांची चळवळ उभारण्यात येत आहे. समाज कल्याण आयुक्तालतर्फे राबविण्यात येणाऱ्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमापैकी हा एक उपक्रम आहे. यामध्ये राज्यातील अनुसूचित जातीतील वंचित, दुर्बल घटकातील लोकांपर्यंत योजना थेट पोहोचण्यासाठी स्वयंसहाय्यता गट काम करतील. उद्योजकतेव्दारे सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाद्वारे राज्यातील प्रत्येक गावात युवा गट स्थापन होणार आहेत. 50 हजार गट स्थापन करण्याचे लक्ष्य विभागाने ठेवले आहे. त्यासाठी 18 ते 45 वयोगटातील युवक-युवती ज्यांना समाजकार्याची आवड आहे, किमान दहावी पास आहेत, स्वयंसेवक म्हणून समाजासाठी विनामोबदला काम करण्याची इच्छा आहे, अशांना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्वतःचा उद्योग सुरू करण्याची तयारी असणाऱ्या तसेच समाजभान असणाऱ्या तरुण तरुणींचा या गटामध्ये समावेश करण्यात येणार आहे. या गटामध्ये 80 टक्के अनुसूचित जातीचे सदस्य राहणार असून 20 टक्के इतर दुर्बल घटकातील सदस्यांचा समावेश असणार आहे. सध्या तालुकास्तरावर बार्टीमार्फत 354 समतादूत कार्यरत आहेत. या समतादूतांमार्फतच युवा स्वयंसहायता गटाची स्थापना करण्यात येणार आहे. युवा गटातील सहभागी होणाऱ्या युवकांच्या स्व-विकास व सबलीकरण याकडे विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्यामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे. 11 ते 15 सदस्यांचा युवागट स्थापन करण्यात येतो. त्या युवागटांना क्लस्टर करणे, शासकीय योजनांचा लाभ देणे, उद्योग सुरू करण्यासाठी व त्यासाठी कर्ज मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणे, लघुउद्योग, बेकरी उद्योग उभारण्यासाठी प्रेरणा देणे, आवश्यक मदत करून अनुसूचित जातीच्या युवकांमध्ये उत्पादकता, उद्योजकता वाढवणे व उद्योजक तयार करण्यासाठी त्यांना प्रेरित करणे ही या गटाची प्रामुख्याने कार्य असणार आहेत.
सध्या यासाठी ग्रामीण व शहरी भागातील युवक युवतींच्या पहिल्या टप्प्यात 1 हजार, दुसऱ्या टप्प्यात 10 हजार, अंतिम टप्प्यात 50 हजार स्वयंसहायता गट स्थापन करण्यात येतील.