बुध्द विचारातच सुख,समृध्दीचा मार्ग-भूपेंद्र गणवीर
-रमाई विहारात बुध्द पोर्णिमा साजरी
नागपूर, दि.10- बौध्द तत्वज्ञान सुखी जीवन जगण्याचा मार्ग आहे. त्यामुळे हा विचार आत्मसात करा आणि सुख, समृध्दीकडे वाटचाल करा,असे आवाहन सकाळ, विदर्भ आवृत्तीचे माजी संपादक भूपेंद्र गणवीर यांनी केले.
ते बुध्द पोर्णिमेनिमित्त रमाई बुध्द विहारात आयोजित प्रबोधन कार्यक्रमात बोलत होते. विहाराचे सभागृह खचाखच भरले होते. गणवीर पुढे म्हणाले, बुध्द धम्मातील पंचसूत्री माणसाला डोळस बनवते. त्यातून अन्य धर्मात आणि बुध्द धम्मात असलेल्या फरकाची रेषा गडद करते. बुध्दाने अनित्यं, करूणा, सजगता, मध्यम मार्ग आणि आत्मशोध दिला. जीवन फुलासारखे उमलते.एका क्षणी बहरते. दुसऱ्या क्षणी मावळते. तरी त्याच्या सौदर्यात कमी येत नाही. त्याप्रमाणे प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा आहे. जीवन हे अमुल्य आहे. त्याचा प्रत्येक क्षण सुखात,आनंदात घालवा. त्यासाठी बुध्दाची करूणा व सजगता आत्मसाथ करा.
अन्य धर्मांवर बोलताना गणवीर म्हणाले, अन्य धर्मांनी मंगळ, राहु, केतू, शनी आदी ग्रह,तारे सांगितले. पापपुण्य सांगितले. त्यांना शांत कराल. तरच सुखी व्हाल ! असे भय दाखवून पुरोहितशाही स्थापित केली. त्या माध्यमातून लुटीचा धंदा सुरू केला. ते पापपुण्य, व्रत, ग्रह,ताऱ्यांची भीती लाथाडा.अन् शोषणाच्या पडयंत्रातून मुक्त व्हा. सुर्य उगवतही नाही आणि मावळतही नाही.हे विज्ञाननिष्ठांनी सिध्द केले. सुर्याभोवती पृथ्वी फिरते. त्यातून प्रकाश,अंधाराची प्रक्रिया घडते. हे समजून घेण्याची गरज आहे. बुध्दाची पंचसुत्री अनेक दाखले व घटनांच्या माध्यमातून समजावून सांगितले.
*संघ-भांडवली साखळी तोडा*
शेवटी अमेरिका व भारताच्या टॉरिप वादाला स्पर्श करताना गणवीर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातले सर्वश्रष्ठ अर्थतज्ञ होते. त्यांनी अनियंत्रित व्यापाराचा विचार दिला होता. त्यात जगात जे,जे धान्य,वस्तू स्वस्त असतील. त्यांची आपल्याला गरज असेल.तर त्यांची आयात करावी.अन् दुसऱ्या देशांना गरज असेल. त्या स्वस्त मालाची निर्यात करावी. जेणे करून जगातील सर्व गरिबांना स्वस्त माल मिळेल. यातून जगातील गोरगरिबांचे जगणे सुखकर होईल. हा जागतिक कल्याणाचा विचार होता. मात्र आरएसएस सारख्या संघटनांनी स्वदेशीच्या नावावर खोटाप्रचार केला आणि भांडवलशाही आणली. त्या भांडवालशाही आणि संघशाहीने हातात घालून सत्ता व संपत्ती आपल्या घशात घातली. 80 टक्के जनतेला गरीब व मध्यमवर्गीयात लोटले. ही जोडी, ही साखळी तोडण्यासाठी सज्ज व्हा. तेव्हाच नोकऱ्या, न्याय, समता,आरक्षण , खऱ्या स्वातंत्राची आणि स्वाभिमानाची भाकरी मिळेल. यासाठी तरूणांना जागवा असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन विहाराचे सचिव दिलिप लेहगावकर यांनी केले. यावेळी अनेक मान्यवरांनी विहारास देणग्या दिल्या. लिमा गणवीर यांनी खीरदाव व दयानंद कांबळे यांनी फलदान केले.