info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  29 Nov 2025

जातीयता गाडू, समता आणू!* - आ. राजकुमार बडोले

**जातीयता गाडू, सामाजिक,आर्थिक समता आणू!*- आ. राजकुमार बडोले

       
मुंबई, दि. २९- मुंबईच्या भूमीत आपण सर्व एक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत. संविधान अमृत महोत्सव ज्या उत्साहात साजरा झाला. त्या महोत्सवाने आपल्याला अभिमान तर दिला; पण एक कठोर सत्यही दाखवले. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत अजून उभारायचा आहे. समता, न्याय, बंधुता या मूल्यांच्या अंमलबजावणीत आपण अद्याप अपूर्ण आहोत. म्हणूनच संविधान जागर ही मोहीम केवळ कार्यक्रम नाही.तो जनतेच्या विवेकाचा आणि स्वाभिमानाचा क्रांतीयुक्त जागर आहे असे माजी सामाजिक न्यायमंत्री आ. राजकुमार बडोले म्हणाले.

लॉर्ड बुद्धा टी.व्ही आणि आ. राजकुमार बडोले फाउंडेशन यांनी एकत्र येऊन देशभर संविधान जागराचे आवाज उठवले. हा संदर्भ देत आ. बडोले म्हणाले, मी अनेक शहरांतील कार्यक्रम बघितले. त्यात खा.छत्रपती शाहू महाराज, माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील, ऋषिकेश कांबळे आणि काही मुस्लिम,मराठा सेवा संघाची मंडळींसह पन्नासावर विचारवंत व्यक्त झाले. शहरें वेगवेगळी होती. परंतु वेदना एकच होती. भेदभावाची वेदना. अन्यायाची वेदना. बेरोजगारीची वेदना, सामाजिक, आर्थिक उपेक्षेची वेदना. ते बघून मला अनेकदा गहिवरून आले. सभागृहात विचारवंत बोलत होते, बुध्दीवंत,  साहित्यिका, पत्रकारांचे भाष्य होते. महाविद्यालयीन तरुणांचे प्रश्न, कामगारांची हाक…जसे ते बोलत गेले, माझ्या हृदयात एक ज्वालामुखी फुलत गेला. लोकांच्या डोळ्यांत चमचमणारी आशा पाहिली आणि त्याच क्षणी मला जाणवले.जसे संसदेत डॉ बाबासाहेब उभे होते आणि म्हणत होते."इक्वॅलिटी इज नॉट अ मॅटर ऑफ चान्स; इट इज अ मॅटर ऑफ वॉर!"ही वज्रवाणी आजही आपल्याला मार्ग दाखवते. मुंबईच्या समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मुंबई लोकमतचे सहाय्यक संपादक यदू जोशी होते.

बॉक्स
*ओटावर एक, पोटात दुसरे,हे  चालणार नाही*

  आ. बडोले  पुढे म्हणाले, संविधान हे केवळ विचारधारा नाही.जीवन कसे जगावे याचा प्रश्न आहे.  समाजात असा मोठा वर्ग आहे ज्यांची ओळख बाबासाहेबांच्या प्रतिमांशी, विचारांशी जुळत नाही, तरी ते फुलांच्या हारात लपत असतात. दीक्षाभूमीच्या सोहळ्यात सहभागी होतात. तेच
 बाबासाहेबांच्या विचारा विरोधात काम करतात.काही जण सामाजिक न्यायाच्या शब्दांनी माला गुंफतात.पण मनात द्वेष. वागण्यात दांभिकता. आणि राजकारणात शोषण करतात अशा दांभिकांना आपण खड्यासारखे बाजूला केलेच पाहिजे. कारण ह्यांच्यामुळंच संविधानाचा आत्मा आजही कृश आहे.

बॉक्स
*सचिन मून आणि टीम एक प्रकाशस्तंभ*
ते म्हणाले, लॉर्ड बुद्धा टीव्हीचा प्रवास म्हणजे संघर्षाची गाथा आहे.आर्थिक अडचणी.साधनांचा अभाव. जाहिरातींचा तुटवडा. हे सगळं असूनही त्यांनी बावीस राज्यांत पोहोचून एक अद्भुत उदाहरण घातलं.मी सचिन मून आणि कुणाल कांबळे या दोघांना मनापासून सलाम केला.कारण त्यांनी दाखवून दिलं. सत्याचा आवाज हा पैशाने नाही, ध्यासाने वाढतो!" यावेळी लॉर्ड बुद्धां टीव्ही आणि राजकुमार बड़ोले फाउंडेशनतर्फे प्रेरणा पुरस्कार 2025  देऊन आंबेडकर चळवळ मजबूत करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान करण्यात आला.

*देशापेक्षा धर्म मोठा.ही चुकीची मानसिकता?*
लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलताना आ. बडोले म्हणाले, आपल्या देशावेदीवर एक गंभीर संकट आहे.धर्माला देशापेक्षा वर स्थान मिळत आहे. जात, जमात, ओबीसी, अल्पसंख्याक यांच्या समस्या राजकारणाच्या कडेला ढकलल्या जात आहेत. सत्ता, संपत्ती, न्यायदान हे उच्चजातीतील लोकांच्या मुठीत आहे. ही परिस्थिती बदललीच पाहिजे! कारण बाबासाहेबांनी संविधान तयार करताना मानवाला केंद्रस्थानी ठेवले.धर्माला नाही!
तथागत बुद्धांनी सांगितलेली करुणा ही सर्वांसाठी होती. कोणत्याही एका धर्म-जात गटासाठी नव्हती.

*महाराष्ट्रातच नाही, भारतभर संविधान जागराचा बिगुल!*
अतिशय भावनिक होत ते म्हणाले,मी आज जे सांगणार आहे, ते माझ्या आयुष्यातील मोठा संकल्प आहे. आता पर्यंत आपण राज्यकर्त्यांना संधी दिली. ७५ वर्षात त्यांनी  विशेष काही केले नाही. आता आपण उभे राहू.  जनतेला सोबत घेवू. संविधान जागर आपण देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात घेऊन जाऊ. ग्रामीण शेतकरी, शहरी मजूर, तरुण, विद्यार्थी, महिला, असंघटित कामगार प्रत्येकाला संविधानाची शक्ती, हक्क आणि समता याचा प्रकाश मिळवून देवू .हा या क्षणी निर्धार आहे. कारण आपल्या देशातील ९० टक्के लोकांच्या हातात सत्ता, संपत्ती, संधी समान प्रमाणात पोहोचवायाची आहे. त्यातून भारताचा चेहराच बदलावयाचा आहे.

*समतेची पहाट आणायची आहे*

आ.बडोले म्हणाले, आजचा हा कार्यक्रम केवळ समारोप नाही.तो एका नव्या लढ्याची सुरुवात आहे.आज आपण येथे घेतलेला संकल्प.जातिभेद गाडण्याचा. धार्मिक दुरावा मोडण्याचा. सामाजिक, आर्थिक समता उभी करण्याचा आहे. हा संकल्प आपण जपला तरच बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होईल.

छाया आणि आकांक्षा यांच्या प्रेरक बुद्ध–भीम गीतांनी आजच्या कार्यक्रमाला भावनिक स्पर्श दिला.त्या सुरावटीत मला भविष्याचा गजर ऐकू आला. समता ,न्याय , संविधानाचा प्रकाश घराघरात नेऊ असे त्यांनी आवाहन केले.आज मी इथून एकच गोष्ट सांगतो.मनभेद विसरा, पक्षभेद विसरा.
मिशनसाठी सज्ज व्हा. एकजूट व्हा. धैर्याने उठा.बाबासाहेबांच्या भारताच्या निर्मितीत योगदान द्या. पुढे ते म्हणाले, आपली ही लढाई कोणाच्या विरोधात नाही.ती अन्यायाच्या विरोधात आहे.ती द्वेषाच्या विरोधात आहे.ती विषमतेच्या विरोधात आहे. प्रास्ताविक सचिन मून यांनी केले. प्रास्ताविकातून लॉर्ड बुध्दा टीव्हीचा पंधरा वर्षाचा प्रवास मांडला आणि वर्धापन दिनाचे औचित्य सांगितले. तर संचालन गवई यांनी केले.
 ................................