info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  17 Oct 2021

सामाजिक न्याय खात्याचा 20 हजार कोटीचा निधी अन्यत्र वळविला* -माजी

*सामाजिक न्याय खात्याचा 20 हजार कोटीचा निधी अन्यत्र वळविला*
-माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा 
लॉर्ड बुध्दा टीव्हीवर गौप्यस्फोट

नागपूर, दि.14- महाराष्ट्रात 2000 ते 2014 च्या काळात सामाजिक न्याय विभागाचा 20 हजार कोटी रुपयाचा निधी अन्यत्र वळविण्यात आला किंवा व्ययगत  झाला असा सनसनाटी  गौप्यस्फोट माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केला.

धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त लॉर्ड बुध्दा टीव्हीवर समाजहिताच्या गोष्ठींतंर्गत काही मुलाखती प्रसारित करण्यात आल्या. त्या अंतर्गंत राजकुमार बडोले यांची मुलाखत घेण्यात आली. त्यात आपण मंत्री असताना पुरेशा निधी खर्च केला नाही असा एका माजी अधिकाऱ्याचा आरोप आहे. याकडे  त्यांचे लॉर्ड बुध्दा टीव्हीने  लक्ष वेधले असता बडोले यांनी आपल्यावरील आरोप धूडकावून लावला. काही लोक स्वार्थापोटी आरोप करीत असतात. ते कोण आहेत. मला माहित आहे. त्या तपशिलात जात नाही. या अगोदर कॉंग्रेस-राकॉचे सरकार होते. तेव्हा 2000 ते 2014 च्या काळात सामाजिक न्याय विभागाचा 20 हजार कोटीचा निधी अन्यत्र वळविण्यात आला किंवा व्ययगत करण्यात आला. हे अंत्यत जबाबदारीने बोलत आहे. तेव्हा हे अधिकारी सत्तेत होते. तरी गप्प होते. मी 2014 ला मंत्री झालो. 2014-2015 मध्ये 91 टक्के खर्च केला. 2015-16मध्ये 86 टक्के.2016-17 मध्ये 85 टक्के. 2017-18 मध्ये-85۔49 टक्के. 2018-19 मध्ये 87 टक्के निधी खर्च केला. राज्यात पूर, दुष्काळ किंवा काही संकट आलं۔ तर सर्व खात्यांचा 10 ते २० टक्के निधी कपात केला जातो. हा भाग वेगळा. मी पुर्ण निधी खर्च करण्याचा प्रयत्न केला.

*कायदा करावयाचं राहीलं..!*

ते म्हणाले, मी मंत्री असताना अनुसूचित जातीचा निधी अन्यत्र वळवू नये अथवा व्यपगत होऊ नये असा कायदा करण्याचा प्रयत्न केला. त्याचा मसूदा तयार आहे. पुर्णवेळ मिळाला असता तर तसा कायदा केला असता. या सरकारने तो कायदा संमत करावा. विद्यमान सरकारने 2019-2020 मध्ये 68 टक्केच खर्च केला. तर 2020-21 दरम्यान 53 टक्केच निधी खर्च केला. हा निधी मागास समाजाचा आहे. तो समाजावरच खर्च झाला पाहिजे. कांगावा करण्यापेक्षा चिंतन झाले पाहिजे. हा समाज अंत्यत दारिद्र्यात जगत आहे. त्या समाजाच्या निधीला सुरक्षा असली पाहिजे. जाती,जमाती,ओबीसींचा निधी प्रामाणिकपणे खर्च केला जावा.  माध्यमांनी सुध्दा याबाबत  आणखी सजग असावे.

ते म्हणाले, सरकारला दोष देत बसणे. यास अर्थ नाही. समाजातील सुशिक्षितांनी पक्षभेद विसरून काम करावे. गोरगरिबांच्या कल्याणासाठी अनेक महामंडळे स्थापन झाली. त्यांना पुरेशा निधीच दिला जात नाही. महामंडळांची स्थिती भीषण आहे. त्यासाठी सरकारवर दबाव आणणारा दबाव गट सक्रीय असलाच पाहिजे. केवळ हेतू प्रामाणिक असावा.
संवादाच्या प्रारंभीच पहिल्याच प्रश्नावर बडोले म्हणाले, सनातन प्रवृत्ती दोन हजार वर्षापुर्वीची आहे. व्यवस्थेच्या नावाखाली ती लादली गेली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. तरी जातीय जोखडांतून सुटका नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीची व्याप्ती मोठी होती. माणूसपण जागविणारी होती. त्यांचा विचार सर्व भारतियांनी अंगिकारला नाही. त्यामुळेच विषमता कायम आहे. ती सामाजिक,आर्थिक क्षेत्रातही  आहे. ती दूर करावी लागेल. त्यासाठी लढावे लागेल.
*इंदूमिलवरील स्मारक भव्यच*
इंदूमिल स्मारकाचा विषय येताच बडोले विस्ताराने बोलताना म्हणाले, शोषित, वंचित व डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयांयाची ही जूनी मागणी . रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर आदींनी अनेकदा मागणी केली होती. ही मागणी अचानक 2014 ला आली नाही.  एक तपापासून प्रलंबित होती. हा तिढा आम्ही सोडविला.तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्यां स्मारकासाठी मंजूर करून घेतली. दादर भागात असलेली ही जागा साडे तीन हजार कोटी किंमतीची. तिच्यावर 25 फुट उंचीची डॉ.बाबासाहेबांची मूर्ती उभारण्याचा  निर्णय झाला. आर्किटेक्चर शशिप्रभू निश्चित झाले. लगेच मूर्तीची उंची वाढवा अशी मागणी सुरु झाली. माझ्या नेतृत्वात एक सदस्य समिती मुख्यमंत्र्यांनी गठित केली. अनेक स्थळांना भेटी दिल्या. न्यूयार्कमधील  स्टैच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा  उंच म्हणजे 350 फुट उंच स्मारक उभारण्याचा प्रस्ताव दिला. राज्य सरकारने मंजूर केला. त्याचे डिझाईन  झाले. काम सुरू करणार. दरम्यान उंबरठाच उंच केल्याचा आरोप झाला. तेव्हा मूर्तीची उंची 400 फुट करण्यात आली. पाया मजबूत राहील.  सुनामी किंवा कितीही मोठं वादळ आलं. तरी धोका होणार नाही.अशा पध्दतीने स्ट्रॅक्चर उभारण्याचे पक्के झाले मला खूषी आहे. ते काम आता सुरू झाले. यासाठी 950 कोटी रू.चा निधी एमआरडीएच्या फंडातून  खर्च करण्यात येणार होता. विद्यमान सरकारने  सामाजिक न्याय खात्याचा निधी या कामासाठी वळविला. ही चूक केली असे ते म्हणाले.
*लंडनचे  निवास स्मारक*
1920-22 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकानॉमिक्समध्ये शिकत असताना. ज्या घरी राहत होते. ते घर मालकाने लिलावात काढले. हे समजताच तेथील आंबेडकरवाद्यांनी हे घर महाराष्ट्र सरकारने विकत घ्यावे. तिथे स्मारक करावे अशी मागणी केली. तिथे फॅबो संघटना आहे.रविदासी आहेत. सर्वांची एकमुखी मागणी होती.मी मंत्री बनून महिना झाला होता. या अगोदर राज्य सरकारने विदेशात संपत्ती घेतल्याचे एकही प्रकरण नव्हते. तरी चार महिन्यात हे प्रकरण मार्गी लावले. ते घर स्मारक बनवू  शकलो. गावखेड्यातून आलेल्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला एवढे मोठे स्मारक बनविण्याची संधी मिळाली. हे माझे भाग्य समजतो.मला अत्यानंद आहे.या कार्याबद्दल मी  समाधानी आहे असे बडोले म्हणाले.

*भीमाकोरेगाव स्मारक*
या प्रश्नावर बडोले थोडे गंभीर झाले.1818 च्या युध्दातील महार व शोषितांच्या शौर्याचे प्रतिक. त्या विजयस्तंभाबाबत बोलताना ते म्हणाले, स्मारकाची 10 एकर जागा. त्या जागेवरच अतिक्रमण करण्यात आले. मी सतत बैठका लावल्या. जागा खाली करून घेतली. एवढेच नव्हेतर खालच्या कोर्टात सरकारच्या बाजूने निकाल लागला.आता हे प्रकरण हायकोर्टात आहे. त्याचा पाठपुरावा ठाकरे सरकारकडून होतांना दिसत नाही. बडोले म्हणाले, या जागे सभोवार सुरक्षा भिंत हवी. तिथे महार बटालियनचे वॉर रूम सुरु करणे. व ईतर कामासाठी निधी दिला.वर्तमान सरकार त्याकडे लक्षच देत नाही. हा शौर्याचा विषय आहे. त्यावर सरकारने गंभीर असावे. स्मारक विकसित  करावे.

*94 जण उच्चशिक्षणास विदेशात...*
उच्च शिक्षणावर ते म्हणाले,  आंबेडकरी समाजाचे आर्थिक प्रश्न भीषण आहेत.  शोषित, वंचितांच्या मुलांनी खूप शिकावे.यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 1942-44 दरम्यान काही मुलें विदेशात पाठविली. त्यात राज्याचे मुख्य सचिवपदापर्यंत पोहचलेले  रमाकांत गायकवाड,उज्वल उके या अधिकाऱ्यांच्या वडिलांचाही समावेश होता. क्यूएस रॅकमध्ये जगातील टॉप 100  विद्यापीठात  मुलाला पाठवावयाचे म्हणजे दोन कोटी खर्च येतो. हा खर्च वर्ग एकच्या अधिकाऱ्याला सुध्दा झेपत नाही.असे असताना अडीच लाखाची उत्पन्न मर्यादा होती. ती हटविली. माझ्या कार्यकाळात जगातील 100 टॉप विद्यापीठात  94 विद्यार्थ्यी उच्च शिकावयास गेले. हे या योजनेचे यश आहे. ही मुलें शिकली.उच्च पदावर गेली.तरच समाजाचा गतीने विकास होईल.  समाज व सरकारच्या दायित्वाने मोठ्या पदावर जाणाऱ्यांनी आपणास समाजाच्या उपकाराची परतफेड करावयाची आहे.ही भावना सदैव जपावी.
 *पुण्यात अभिनयाचे धडे....*
अभिनयाचे धडे  आणि झाडीपट्टी प्रश्नावर बडोले म्हणाले, मराठी नाट्य रंगभूमी मुंबई,पुण्यात विकसित आहे. झाडीपट्टीत सुध्दा रंगभूमी आहे. तिचे लोण गावागात पोहचले आहे. त्यातील होतकरू कलाकारांना  अगोदर बार्टीत सहा महिने प्रशिक्षण दिले. त्यानंतर अभिनयाचे धडे देणाऱ्या पुण्याच्या संस्थेत पाठविले. यातून झाडीपट्टी रंगभूमी बळकट होईल असा विश्वास बडोले यांनी व्यक्त केला.

*खासगी क्षेत्रात आरक्षण...!*

खासगीकरणाने आरक्षण धोक्यात आले असे वाटत नाही का .या सरळ प्रश्नावर थोडे थांबले. त्यानंतर म्हणाले, सरकारी मदतीने उभारण्यात येणाऱ्या उद्योगांत आरक्षण हवे.पक्षभेद विसरून या प्रश्नावर समाजाने एकत्र यावे.दबाव गट वाढविल्यास सरकारला ते करावे लागेल.या मागणीचा मी सदैव पाठपुरावा करेन असाही निर्धार त्यांनी  धम्मचक्र प्रवर्तन दिनी व्यक्त केला.