info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  02 Aug 2022

नाणी संग्रहकांना लाखोंनी लुबाडणाऱ्या टोळ्या...!


- आरबीआय लोगोचा दुरूपयोग
नागपूर ,दि.1-  ' वैष्णोदेवी का पाच का सिक्का और पाच रुपये का ट्रेकटरवाला नोट पाच लाख मे खरीद ते है, रातोरात मालामाल बननेका अवसर '  अशा आशयाच्या आकर्षक पोस्ट फेसबुकवर टाकतात. मोबदल्यात अनेक कोटींचे प्रलोभन देतात. सावज टप्पात आला की लुबाडतात. त्याद्वारे  प्राचीन आणि जुनी नाणी संग्रहकांना लुबाडणाऱ्या टोळ्यांचा देशभर मोठा धुडगुस घातला आहे.
विश्वास बसावा म्हणून या टोळ्या आपल्या पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेते अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी, रतन टाटा आणि सोनू सूद यांच्या छायाचित्रांचा सर्रास वापर करीत आहेत.
जाळ्यात अडकलेल्यांचा आणखी विश्वास जिंकण्यासाठी प्रत्यक्ष व्यवहाराच्या वेळी चक्क आरबीआय लोगोचा वापर करीत आहेत. विविध फेसबुक ऍडमिनही या टोळ्यांच्या पोस्ट सर्रास प्रसिद्ध करीत आहेत. 

एका टोळीने लुबाडलेल्या एका पीडिताने पुराव्यानिशी आपबिती सांगितली . ती माहिती धक्कादायक आहे.
लॉकडाऊन काळ होता. या काळात या टोळ्यांच्या आकर्षक फेसबुक पोस्ट वाढल्या होत्या. त्यातून अनेकांना जुनी नाणी संग्रह करण्याचा छंद जडला, आता मोठ्या प्रमाणावर हा छंद जोपासला जात आहे.
आपली जुनी नाणी विकून मोठा पैसा येण्याच्या आशेने पीडित व्यक्तीने एका अपलोड पोस्टचा आधार घेऊन पश्चिम बंगालच्या ओल्ड  क्वांईन सेल्स ऍण्ड बाय या कंपनीशी संपर्क साधला.
दयाशंकर जगदंबाप्रसाद मिश्रा, असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने व्हॉट्सअपवर नाण्यांची छायाचित्रे पाठविण्यास सांगितले.
पीडितने छायाचित्रे पाठविली असता त्याला मिश्रा याने आपल्या एका बड्या अधिकाऱ्याचा हवाला देऊन ९० कोटींमध्ये नाणी खरेदी करण्याची तयारी दाखवली.  या प्रलोभनात पीडित अडकला. क्षणाचा विचार न करता त्याने होकार दिला. त्या बरोबर एक नोंदणी फॉर्म पाठविला. त्यासोबत ९९९ रुपये ऑनलाईनने भरण्यास सांगितले. याशिवाय पासपोर्ट छायाचित्र, पॅनकार्ड , आधारकार्ड आणि बँक खात्याचा नंबर मागितला.
पैसे भरण्यासाठी मिश्रा याने पुरवलेल्या माहितीत कोलकात्याच्या ओरिएंटल एक्स्चेंज ऍण्ड फायननसियल सर्व्हिसेस या कंपनीचा . तसेच खातेधारक म्हणून मुन्नीदेवी नावाच्या महिलेचा उल्लेख होता. पेटीएम आणि फोन पे करिता दोन वेगळे क्रमांकही दिले होते. पीडितने ऑनलाईन पैसे भरले. त्या बरोबर अंकित आर नावाच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा  मोबाईल संदेश आला. 
पुढे मिश्रा याने प्रोसेसिंग फी २८०० रुपये भरण्यास सांगितले. पीडितने  लगेच ही रक्कमही भरली. आम्ही ताबडतोब पाच मिनिटात ९० कोटी तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करीत आहोत, असे मिश्रा याने सांगितले .त्यानंतर त्याने व्हॉट्सअपवर चक्क आरबीआयचा लोगो असलेली एनओसी लोड केली. त्यात ४५ कोटी रुपये मंजूर झाल्याचा आणि १६ हजार ५०० रुपये एनओसी चार्ज भरण्याचा उल्लेख होता. त्याने ती सुध्दा रक्कम भरली. त्यानंतर आपण लुबाडले जात आहेत असा त्याला संशय आला.  अशा पध्दतीने अनेक जण लुबाडले जात आहेत.
कोट्यवधींचे आमिष दाखवीत ही टोळी सावजाला  एखाद्या अजगरासारखे विळखा घालून लाखो रुपयांनी लुबाडणूक करीत आहे. लॉकडाऊन काळात विदेशी टोळ्या मोठया प्रमाणावर सक्रिय होत्या आता देशी टोळ्या लुबाडत आहेत.