सिरोंचा तालुक्यात केंद्रीय पथक, पूरग्रस्त भागाची पाहणी
*गडचिरोली, दि.२* : जुलै महिन्यात जिल्हयातील सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीच्या पुरामूळे दहा हजाराहून अधिक नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले . शेती, घरे, रस्ते व जनावरे यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने आज सिरोंचा तालुक्यातील आरडा, मुगापूर, मद्दीकुंठा व मृदुकृष्णापूर या गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी सिरोंचा ते कालेश्वरम या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. या पथकात रूपक दास तालुकदार, उप सचिव वित्त विभाग अर्थ मंत्रालय, ए एल वाघमारे, संचालक, कृषी विभाग नागपूर, देवेंद्र चापेकर, कार्यकारी अभियंता, रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांचा समावेश होता. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कृष्णा रेड्डी व तालुका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
*पूरबाधित क्षेत्रातील ग्रामस्थांशी साधला संवाद*
जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सिरोंचा येथील झालेल्या नुकसानीबाबत पथकातील सदस्यांना माहिती दिली. तसेच यावेळी पथकातील सदस्यांनी गावांमधील उपस्थित शेतकरी नागरिक यांच्याशी झालेल्या नुकसानी बाबत चर्चा केली. उपस्थित शेतकरी शेतकऱ्यांनी पथकातील सदस्यांना शेती विषयक धारण विषयक तसेच जनावरे जीवित हानी याबाबतची सविस्तर माहिती दिली. पथकाने स्थानिक शेतकऱ्यांसह शेतात जाऊन बांधावर पूरस्थितीची पाहणी केली व गावकऱ्यांना तपासणी अहवाल केंद्राकडे सादर करून आवश्यक ती प्रक्रिया तातडीने करू अशी ग्वाही दिली.
*जिल्हास्तरावर विभाग प्रमुखांची बैठक*
केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संबंधित सर्व विभागांच्या विभाग प्रमुखांकडून पूरबाधित नुकसानीची माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी झालेल्या नुकसानी बाबतचे सादरीकरण केले तर संबंधित विभागप्रमुखांनी संपूर्ण तपशील केंद्रीय पथकापुढे मांडले.