दीक्षाभूमी धम्म क्रांतीची प्रेरणाभूमी-आ.राजकुमार बडोले
-भीमसेनेचा दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन
सोहळा
नागपूर, दि. 3 ऑक्टोबर -
“दीक्षाभूमी हे केवळ धार्मिक स्थळ नाही. ती सामाजिक आणि धम्म क्रांतीची प्रेरणाभूमी आहे. समतेची प्रतीक आहे , असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री आ.राजकुमार बडोले यांनी केले.
भीम सेनेच्यावतीने दीक्षाभूमीवर ६९ वां धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा पार पडला. त्यात बुद्ध भीम गीतांचा महाजलसा आणि बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम झाला. यावेळी राजकुमार बडोले प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. मंचावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश सुरेश कुमार कैत, आमदार संजय मेश्राम, भिमराव आंबेडकर, पुरण मेश्राम, भदंत हर्षबोधी महास्तवीर, भदंत विनाचार्य, श्रीधरजी साळवे यांच्यासह भिक्खुसंघ आणि बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बडोले पुढे म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धम्मदीक्षा दिली. त्यामागे देशविदेशात बौध्द शक्ती निर्माण व्हावी. त्या शक्तींचा भारतातील बौध्दांच्या प्रगतीत हातभार लागावा अशी दूरदृष्टी होती. त्यांनी दाखविलेल्या समता,बंधुत्व, करुणेच्या मार्गाने चाला आणि धम्म प्रचारात आपले योगदान द्या . बौध्दाच्या हक्काच्या लढ्यात सहभागी व्हा.असेही त्यांनी आवाहन केले.
बुद्ध भीम गीतांच्या महाजलसाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, तर धम्म दीक्षा कार्यक्रमात अनेक अनुयायांनी बौद्ध धम्म स्वीकारून सामाजिक परिवर्तनाचा संकल्प केला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भीम सेनेचे सर्वत्र कौतुक होत होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राजकुमार बडोले यांनी सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी सोहळ्याच्या क्षणांचा उल्लेख करत सर्वांना बाबासाहेबांच्या विचारांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुरेशकुमार कैत म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून न्यायहक्क दिले. त्यांनी दिलेला धम्म मानवमुकीचा संकल्प होय. यावेळी अन्य वक्त्यांचीही भाषणे झाली.