खासगी बस वाहतूकदारांनी जादा भाडे आकारल्यास कारवाई
खासगी बस वाहतूकदारांनी
जादा भाडे आकारल्यास कारवाई
नागपूर दि. 22- खासगी प्रवासी बस वाहतूकदारांना परिवहन विभागाने लगाम लावण्याचा निर्णय घेतला आहे. जादा भाडे आकारणी केल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी खंडेराव देशमुख यांनी दिला आहे.
प्रादेशिक परिवहन महामंडळातर्फे एसटी बस प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. ही सेवा देत असतानाच त्याच मार्गावर खासगी बसेसही धावत असतात. परंतु त्यांच्याकडून जादा भाडे आकारणी केल्याच्या तक्रारी प्राप्त होत असतात. त्या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस पाहता गर्दीच्या हंगामात खासगी बसगाड्यांना प्रति किलोमीटर भाडेदराच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त भाडे राहणार नाही, असे दर शासनाने २०१८ मध्येच निश्चित केले आहेत. त्यानुसार वातानुकूलीत व अवातानुकूलीत बससाठीचे दर निश्चित केलेले आहे.
खासगी बसधारक प्रवाशाकडून जास्त भाडे वसूल करतात. अशा पध्दतीच्या तक्रारी प्राप्त झाल्यास व तपासणी अंती त्या सत्य असल्याचे निदर्शनास आल्यास त्या परवाना धारकाविरुध्द मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
अधिक दर आकारल्यास एमव्हीडी कम्पलेंट डॉट इ एन एफ एफ 2 ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेल आयडीवर पुराव्यासह तक्रार करता येईल,असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर शहर कार्यालयाने कळविले आहे.