क्रांती आणि संस्कृती
क्रांती आणि संस्कृती ..
जगात संस्कार, संस्कृती आणि इतिहासावर चर्चा झडतात. भारत त्यास अपवाद नाही. जातपात प्रवृती जोपासणारी संस्कृती वाईट. तिचे खाऱ्या पाण्याच्या समुद्रात विसर्जन व्हावे. मनामनातून जावी. तिच्या विसर्जना शिवाय बलशाली भारताचे स्वप्न निरर्थक. एकिकडे त्या संस्कृतीचा अभिमान बाळगणे. दुसरीकडे बलशाली भारताचे स्वप्न बघणे. नोटबंदी एवढेच खोटे. ही वस्तुस्थिती. 2021 हे मावळत वर्ष. मावळत्या वर्षात \' डॉ.आंबेडकर: क्रांती आणि संस्कृती \' पुस्तक हातात पडलं. पुस्तकाचे लेखक डॉ. प्रकाश खरात. प्राध्यापक ते प्राचार्य असा त्याचा प्रवास. दुसऱ्या पिढीतील ते साहित्यिक. राज्यातील टॉप साहित्यिकात त्यांची गणना. त्यामुळेच संस्कृतीवर लिहलेल्या त्यांच्या पुस्तकाबाबत कमालीची उत्सूकता .172 पानांचे पुस्तक. पहिलेच पान उघडलं. त्यात बुध्दाच्या क्रांतीतून नवी समाजसंस्कृती घडली. ती दीक्षाभूमीतून साकारली. या दोन वाक्यांनी पुस्तकात काय दडलं असेल. त्याचा उडता अंदाज आला.
पुस्तकाचं एक-एक पान उलटत गेलो. त्या प्रत्येक पानासोबत इ.स. सहाव्या शतकापासूनचा इतिहास पलटत गेला. मूळ सिंधू संस्कृती. ती मूलनिवासी शुद्र-अतिशुद्र, आदिवासी. जमीन कसणाऱ्या श्रमिक, शेतकऱ्यांनी निर्माण केली. त्या सिंधू संस्कृतीचे नवे समाजविज्ञान घडविले बुध्दाने. इ.स.पूर्व सहाव्या शतकात बुध्दाचा उदय झाला. त्यापुर्वी दोन संस्कृती होत्या. एक लोककल्याणाची संस्कृती . त्या संस्कृतीतून बुध्द आले. तथागत बुध्दाने कल्याणकारी विचार अधिक समृध्द केला. ती समृध्द संस्कृती बुध्द संस्कृती बनली. त्या संस्कृतीचा प्रभाव जगावर पडला. तो विचार बुध्द विचार ठरला. ती संस्कृती बुध्द संस्कृती ठरली. ती जगभर पसरली. मात्र भारतातून लुप्त झाली. हा तीन हजार वर्षा पुर्वीचा इतिहास उत्खननातून पुढे आला. विदेशी पर्यटक व इंग्रजांनी त्यावर प्रकाश टाकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याचा अभ्यास केला. ते एवढ्यावरच थांबले नाही. तर बुध्द संस्कृती ही समतेची संस्कृती आहे. ती जगाला तारक आहे. विकासाला चालना देणारी आहे. तिचा प्रचार व प्रसार व्हावा. हे त्यांना पटले. हा विचार त्यांनी आत्मसात केला. त्यांनी तो नागपूरच्या दीक्षाभूमीवरून जगाला दिला. या संस्कृतीचा प्रवास कसा घडला. हे प्रत्येक पान सांगते. त्यासाठी दिलेले संदर्भ ठोस आहेत. बुध्दवंशी या एका शब्दात त्यांनी तीन हजार वर्षाचा इतिहास बोलका केला.
सिंधू संस्कृती ही भारताची मुळ संस्कृती. मूल निवासींना तिचा अभिमान. ती मागधी, प्राकृत, पाली, ब्राम्ही लिपीत आहे. त्यांनी शिलालेख कोरले. स्तूप, चैत्य, विहारं बांधली. अजिंठा, वेरूळ, भाजे, कार्ले, पितळखोरी, कान्हेरी, नाशिक, महाड इत्यादी बौध्दलेण्या निर्माण केल्या.
मधल्या काळात अनेक संस्कृती आल्या. त्या आल्या, तशाच लोप पावल्या. टिकली ती मुळ संस्कृती. तिच्यावर अनेक आक्रमणं झाली. हल्ले झाले. जाळपोळ झाली. विध्वंस झाला. ती चोरली.भेसळ केली. तरी ती टिकली. तिचे एकमेव कारण ती विज्ञानवादी संस्कृती होय. हे अनेक दाखले देत. पुरावे मांडत. संदर्भ देत डॉ. प्रकाश खरात लिहिते झाले. हे करताना अनेक चुकीचे संदर्भ त्यांनी खोडले. बुध्द ते आंबेडकर आणि वर्तमाना पर्यंतच्या कालखंडाचा आरसा दाखवला.
सिंधूसंस्कृती, नागसंस्कृती, श्रमणसंस्कृती, द्रविडसंस्कृती ही बुध्दसंस्कृतीची जुनी रूपं सांगितली. उत्खननातून सारनाथ,वैशाली,सांची, लुबिंनी, कपिलवस्तू, कुशीनगर, बुध्दगया वास्तू सापडल्या. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्र, कर्नाटक, गुजरात, केरळ व भारताच्या अनेक प्रदेशात, विविध देशात उत्खननातून स्तूप, लेण्या, मूर्ती बाहेर आल्या. आजही येत आहेत. इतकी वैभवशाली मूल संस्कृती आहे. मोहनजोदडो,हडप्पी हा स्थापत्यकाळ आहे.वैभवी चित्रकला, स्थापत्यकला. संगीतकला, साहित्यकला, उपचारकला, व्यायामकला आहे. उच्चकोटीचे तत्वज्ञान आहे. समाजशास्त्र, अर्थशास्त्र आहे. मानवी सभ्यता आहे. संस्कृतीची प्रतीकं आहेत. त्यात बुध्द, बोधिसत्व, बोधीवृक्ष,पंचशील, त्रिशरण अशोकचक्र आहे. गौत्तम, सिध्दार्थ, अशोक, हर्षवर्धन, विशाखा, वैशाली अशी नावं आहेत.1920 नंतरचा काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. त्यांचे लढे आहेत.लेखन आहे. धम्मदीक्षा आहे.अन् आजपर्यंतची वाटचाल आहे. बुध्द आणि आंबेडकर क्रांती, परिवर्तन, प्रबोधनाला बुध्द संस्कृती म्हणून संबोधले आहे. राजसत्ता, धर्मसत्ता, राजेशाही, हुकुमशाही आणि बुध्द संस्कृतीतील लोकशाहीचे विश्लेषण आहे. प्रज्ञा, शील, करूणेचा उच्चार आहे.समता, बंधूता व न्यायाच्या संकल्पनेची मोहक मांडणी आहे. शंभरांवर पुस्तकांचे संदर्भ आहेत. बुध्द ते आंबेडकर ही सामान्यांची संस्कृती. ती समजून सांगितली आहे.
आक्रमणकाऱ्यांनी तीन हजार वर्षा पुर्वीच्या संस्कृतीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आर्याच्या वैदिक संस्कृतीने भारतातील मूल संस्कृतीला सर्वाधिक हानी पोहचवली. मूलवासींना ज्ञानापासून वंचित केले. बळजोरीने अज्ञानी ठेवले. पुराण, रामायण, महाभारत लिहले. अंधश्रध्दा, दैववादाचे संस्कार बिंबविले. मनुस्मृती सारख्या ग्रंथांतून वर्णभेद, जातीपाती थोपल्या. बहुसंख्यांकांना गरिबीत लोटले. त्यामुळे भारताचा जुना सुवर्णकाळ, सोन्याचा धूर सोडणारा भारत. गरिब भारत बनला. यास जबाबदार आर्य आक्रमण आहे. हे नाकबूल करणे. म्हणजे स्व:ताशी केलेली बेईमानी ठरेल.
आर्य हे युरोशियनी. मोगल, इंग्रज, पोर्तुगीजांसारखे ते आक्रमणकारी. मध्य आशियातून, उत्तर धुर्वावरून, इराणमधून खैबरखिंडीद्वारे ते भारतात आले. या पुस्तकात लेखकाने सर्वात धुर्त, कपटी, क्रुर, विध्वंसी आक्रमणकारी आर्य असल्याचे सप्रमाण सांगितले. त्यासाठी फुले,आंबेडकरापर्तंच्या अनेक विद्वानांच्या विचारांचा हवाला दिला. त्यामुळे त्यांच्या तर्काला आणखी वजन मिळाले. आतापर्यंतच्या उजव्या साहित्यिक व विचारवंतांनी केवळ मोगल व इंग्रजांच्या आक्रमणाचेच दुष्परिणाम सांगितले. आर्य आक्रमणावर पडदाच टाकला. हा पडदा उचलण्याचे काम काही प्रमाणात या पुस्तकाने केला. हा अधिक विस्ताराने होण्याची गरज होती. लेखकाने आर्य आक्रमण स्वतंत्रपणे हाताळावा.त्यावर आणखी एक पुस्तक लिहावे.आर्य आक्रमणाचा काळा इतिहास प्रभावीपणे मांडावे असे मला वाटते. तसेच अनेक वाचकांना हमखास वाटेल. डॉ. खरातांचे हे वैचारिक लेखन आहे. हे त्यांचे लेखन आंबेडकरी साहित्यिकांतील विचारवंतांच्या टॉप श्रेणीत मोडणारे आहे. या पुस्तकात लेखकाने अनेक देशात पसरलेल्या धम्माला तथाकथित भारतिय लेखक संप्रदाय संबोधतात आणि एकाच देशात असलेल्या संप्रदायी धर्माला मोठे समजतात. ही कुठली बुध्दीमत्ता...! असा प्रश्न खरात विचारतात. हे दृष्ट कावे ओळखण्याची क्षमता भारतीयात यावी. अशी अपेक्षाही करतात. बुध्द-आंबेडकर संस्कृती कमी वेळात समजून घ्यावयाची असेल तर पुस्तक वाचावे लागेल.
-भूपेंद्र गणवीर
.....................BG.....................