info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  19 Jul 2022

जाॅरड्रेल बॅंक अवकाश संशोधन केंद्र भेटीत उलगडली अनेक गुपितं.....

विदेश प्रवास अनुभव
● जोरॅड्रल बॅंक अवकाश संशोधन केंद्र आणि अवकाश निरीक्षण केंद्रात लोव्हल टेलिस्कोप आणि मार्क-2. हे दोन टेलिस्कोप आहेत. हे अवकाश भौतिकी संशोधन केंद्र १९४५ मध्ये प्रसिद्ध रेडीओ खगोलशास्त्रज्ञ बर्नार्ड लोव्हल यांनी दुसर्या महायुद्धांच्या काळात काॅस्मीक किरणांच्या संशोधनासाठी विकसीत केले होते. त्यात काॅस्मीक किरणांच्या संशोधनाबरोबर गुरूत्वीय किरणे,एस्राईड,व विविध खगोलशास्त्रीय विषयावर संशोधन केले जाते.
 
जोरॅड्रल बॅंक अवकाश संशोधन केंद्र अत्यन्त भव्य असुन २०१९ मध्ये युनेस्कोने या अवकाश संशोधन केन्द्राला जागतीक वारसा (वर्ल्ड युनेस्को हेरिटेज)म्हणून घोषित केले आहे. 
 
         यात लोव्हल हे मुख्य रेडिओ टेलिस्कोप आहे .त्याचा व्यास २५० फुट आहे.ते जगातील तिसरे सर्वांत मोठे स्टिरेबल टेलिस्कोप आहे.
जोरॅड्रल बॅंक अवकाश संशोधन केंद्रातील तारांगणात अवकाशातील अनेक चमत्कारिक गोष्टींचा व नवनवीन विषयांवर, विषेषत्वाने अवकाश भौतिकी, गुरूत्वीय किरणे, ब्लॅक होल,डाॅर्क मॅटर,इत्यादी अनेक बाबींचा उलगडा करून सामान्य माणसाला हे विश्व किती विशाल आहे,याची कल्पना मांडणारे आणि असंख्य आकाशगंगा आणि सुर्यकूल असुन त्यांच्या मध्ये अजस्त्र क्रूष्णविवर असल्याचे भास करणारे माहितीपट तिथल्या स्पेशल डोम मध्ये  दाखविले जातात. 
हे बघताना आपण किती क्षुल्लक आहोत याचा क्षणिक भास झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या सुर्यकुलासारख्या किंबहूना त्याहुनही प्रचंड विशाल आणि अजस्त्र असलेली असंख्य सुर्यकुले आणि आकाशगंगा ब्रम्हांडात असून त्या असंख्य प्रकाशवर्षे दूर आहेत याचा भास होतो.असंख्य आकाशगंगा हजारो प्रकाशवर्षे दूर असल्यामुळे त्या आपल्याला पाहता येत नाहीत परंतू रेडिओ टेलिस्कोप च्या माध्यमाने आपल्याला त्यांचा अभ्यास करता येतो.या अजस्त्र ब्रम्हांडात आपण मात्र जाती,धर्म, भाषा,प्रांत, यांच्या कल्पनांत स्वतःला कोंडून हळूहळु स्वतःला संपवित असल्याची जाणीव मनाला झाल्याशिवाय राहत नाही. आपला अस्तित्व किती इवलासा आहे याची जाणीव आपल्याला या क्षणी होते.
हे सांगताना प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाइन चा विचार सांगावासा वाटतो.ते म्हणाले होते,"It was of course, a lie what you read about my religious convictions, a lie which is being systematically repeated. I do not believe in a personal God and I have never denied this but have expressed it clearly. If something is in me which can be called religious then it is the unbounded admiration for the structure of the world so far as our science can reveal it."
     हे माहीतपट दाखविणारे खगोलशास्त्रीय वास्तु व सेंटरची सुरवात ४जून २०२२ मध्ये नव्याने झाली.        
दोन माहीतीपट पाहिल्यानंतर श्रुतीने आम्हाला तिथली  खगोलशास्त्रीय प्रथमदर्शनी पाहायला नेले.
ताईने आग्रहाने आम्हाला एका गॅलरीत नेऊन बसविले. त्यात कांही संशोधक नवनवीन खगोलशास्त्रीय संशोधनाची माहिती स्क्रीनवर देत होते.हे माहितीपट खगोलशास्त्रीय गॅलरीत सतत दाखविले  जात होते.आम्ही त्या स्क्रिनपुढे बसलो. आणि आश्चर्य म्हणजे त्या माहीती पट देणार्या संशोधकात काही वेळाने, "श्रूती बडोले "या खगोलशास्त्रीय मुलीने गुरूत्वीय किरणे, डाॅर्क मॅटर या बद्दल माहिती देण्यास सुरवात केली. हे बघून आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. 
       
        खरे म्हणजे आम्हाला ते पुर्वी माहीतच नव्हते. श्रूतीने आम्हाला दिलेली ती एक सुखद आणि अभिमानाची भेट होती.आम्हाला त्यातले खुप काही कळले नाही.परंतू आपल्या पोरीने आपल्या परीश्रमाने शिक्षणाचे चीज केले याची जाणीव आम्हाला झाली.आम्ही डोळ्यात आनंदाश्रू घेऊन बाकी सगळे पाहत होतो....

- राजकुमार बडोले, माजी सामाजिक न्याय मंत्री .महाराष्ट्र.