लोकसहभागातून भूजलाचे जतन करा- उध्दव ठाकरे
लेकसहभागातून भूजल संपत्तीचे जतन करा
- उद्धव ठाकरे
मुंबई दि.१६ : -भूजल संपत्ती ही अतिशय महत्त्वाची असून या संपत्तीचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने गेल्या ५० वर्षात अतिशय महत्त्वाचे कामू केलेले आहे .यापुढेही हे काम अधिक जोमाने करण्यासाठी या कार्यात लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रम आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाला .त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले,जमिनीवरचे पाणी हे दृश्य स्वरूपात दिसते . त्यामुळे त्याचे नियोजन करणे त्यामानाने सोपे जाते. परंतु भूगर्भात असलेल्या भूजलाचे संशोधन करून नियोजन करण्याचे काम ही यंत्रणा करीत आहे. म्हणून या संपत्तीचे संवर्धन आणि जतन करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
भूजल संपत्ती वाढवण्यासाठी भूजलाचे पुनर्भरण करणे आवश्यक आहे आणि या पुनर्भरणाचे विविध तंत्रज्ञान आणि उपाय योजना या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत आहेत व विकसित केल्या आहेत. त्यामध्ये लोक सहभाग वाढविण्याची गरज आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला जे जे सहकार्य लागेल ते शासनातर्फे करण्यात येईल. यंत्रणेतील जो कर्मचारी वर्ग अत्यावश्यक आहे, त्या पदांची प्राधान्यक्रमानुसार भरती करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने तांत्रिक मार्गदर्शन व भुजलाचे विविध पैलू समजण्यासाठी ज्या विविध पुस्तिका तयार केल्या आहेत त्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले व त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले, राज्यातील जनतेला गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने अंतर्गत राज्यात १८३ प्रयोगशाळा पाणी तपासणी प्रयोगशाळा मंजूर आहेत. त्यामधून पाण्याचे नमुने तपासले जातात, गुणवत्तेबाबत काळजी घेण्यात येत आहे.
बाटलीबंद पिण्याचे पाणी तपासणे गरजेचे असून ते योग्य आहे की नाही याची शहानिशा करणे आवश्यक आहे असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुण्यातील नांदेड सिटी भागात पिण्याचे पाणी आणि वापराचे पाणी पुरविण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन आहेत. त्याद्वारे नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो.अशा प्रकारच्या योजना राबविण्याची गरज आहे असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.