info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  18 Dec 2025

दोन्ही अर्जुनीत सुरांचा स्पर्श आणि संस्कृतीचा जागर

19 ते 23 डिसेंबरपर्यंत दोन्ही अर्जुनीत
सुरांचा स्पर्श आणि संस्कृतीचा जागर…

गोंदिया दि.18- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात लवकरच संस्कृतीचे आभाळ फुलणार आहे. काळाच्या धावपळीत हरवू पाहणाऱ्या लोकपरंपरा, गीत-नृत्य, विचार आणि साधना यांना पुन्हा एकदा श्वास देणारा पाच दिवसीय भव्य सांस्कृतिक महोत्सव येथे साकारत आहे. आमदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून आयोजित होणार आहे. हा सोहळा केवळ कार्यक्रमांचा संच नसून, आपल्या मातीशी, माणसाशी आणि मनाशी नाते जपणारा एक भावनिक उत्सव ठरणार आहे. सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या भूमीत लोकसंस्कृतीचा दीप उजळणार आहे. हा प्रकाश दूरदूरपर्यंत पोहोचेल, अशी आशा आहे.

१९ डिसेंबर रोजी सडक अर्जुनी येथील आशीर्वाद लॉनमध्ये या सांस्कृतिक पर्वाची सुरुवात होणार आहे.  खा. प्रफुल्ल पटेल  यांच्या अध्यक्षतेत जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नायक  कार्यक्रमाचे उदघाटन  करतील. यावेळी भाजपचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, स्वागताध्यक्ष आ. राजकुमार बडोले आणि जिल्ह्यातील आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ होईल. प्रारंभी पावा यांच्या लाइव्ह म्युझिक आणि ध्यानसाधनेच्या कार्यक्रमातून सुरांची ओंजळ आणि शांततेचा स्पर्श लाभेल. संगीताच्या लयींतून आणि ध्यानाच्या स्थैर्यातून विचारांची बीजे मनामनांत रोवली जातील. गोंगाटाने भरलेल्या वर्तमानात अंतर्मुख करणारा हा क्षण अनेकांसाठी आत्मशोधाचा मार्ग ठरेल.२० डिसेंबरला दांडिया स्पर्धेच्या तालावर तरुणाईचा उत्साह उधळेल. रंगीत वेष, नादावलेले पाय आणि एकात्मतेचा आनंद या उत्सवाला नवे बळ देतील. हे दोन्ही कार्यक्रम सडक/अर्जुनीत होतील. उर्वरित 21 ते 23 डिसेंबर पर्यंतचे  कार्यक्रम मोरगावी/अर्जुनीत होणार आहेत.

 २१ डिसेंबर रोजी पारंपरिक नृत्य स्पर्धेतून आपल्या लोककलेचा अभिमान, आपल्या इतिहासाचा श्वास मंचावर अवतरलेला दिसेल. पिढ्यान्-पिढ्या चालत आलेली कला केवळ दाखवली जाणार नाही, तर ती अनुभवली जाणार आहे.

२२ डिसेंबर रोजी शिवलीला पाटील यांचे सुश्रुत कीर्तन भक्ती, ज्ञान आणि संस्कार यांचा संगम घडवेल. शब्दांच्या ओघात जीवनमूल्यांची उजळणी होईल, मनाला स्पर्श करणारे विचार अंतःकरणात घर करतील. आणि २३ डिसेंबर रोजी इंडियन आयडल फेम सवाई भट्ट यांच्या लाइव्ह कॉन्सर्टने या महोत्सवाचा कळस गाठला जाईल. त्यांच्या स्वरांतून भावनांचा महापूर वाहील आणि हा उत्सव आठवणींच्या कोशात कायमचा कोरला जाईल. लोकसंस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आणि समाजात सांस्कृतिक जाणीव जागवण्यासाठी हा महोत्सव साकारत आहे. या प्रेरणादायी उपक्रमामागे या भागाचे आमदार राजकुमार बडोले यांची दूरदृष्टी आणि संवेदनशीलता उभी आहे. जनतेला एकत्र आणणारा, मनामनांत आशा आणि अभिमान जागवणारा हा सांस्कृतिक महोत्सव अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघाच्या इतिहासात संस्कृतीच्या सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा अध्याय ठरेल.यात शंका नाही.