info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  08 Sep 2022

सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षणावर भर देण


मुंबई, दि.9- राज्यातील शाळांचा दर्जा वाढवितांनाच विशेषत: सरकारी शाळांचे सक्षमीकरण करण्याच्या तसेच पूर्व प्राथमिक स्तरांपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देशही दिल्याचे ते म्हणाले.  

वर्षा येथील समिती सभागृहातून शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी मुख्यमंत्र्यांनी दूर दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सचिव रणजितसिंग देओल, संचालक कैलास पगारे उपस्थित होते तर राज्यातील जिल्हाधिकारी यांच्यासह शिक्षक दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

*नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वसमावेशक*

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, महाराष्ट्राने शिक्षणामध्ये दिशादर्शक काम करुन देशाला नेहमीच नवनवीन प्रयोग आणि विचार दिले आहेत. राज्यातील सर्व मुलांना समान व गुणवत्तापुर्ण दर्जाचं शिक्षण देण्यासाठी शासनाने केंद्र शासनाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत काही महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक निर्णय घेतले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. 

*सरकारी शाळांच्या सक्षमीकरणाकरीता धोरणात्मक निर्णय*

शाळांच्या विकासासाठी विशेषतः सरकारी शाळांच्या सक्षमीकरणाकरीता अनेक धोरणात्मक निर्णय शासनाने घेतले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा प्रयत्न केला असून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणावर ६ टक्के खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षणामध्ये गळतीचे प्रमाण, शिक्षकांच्या योग्य मूल्यमापनाची प्रक्रिया या सर्वच बाबींचा नवीन शैक्षणिक धोरण आणताना या निर्णयांमध्ये विद्यार्थी केंद्रीत विचार असून संपूर्ण शिक्षण विभाग फक्त मुलांच्या शिक्षणासाठी सर्व स्तरांवरुन काम करेल. यासाठी पोषक वातावरण या माध्यमातून निर्माण करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

*शिक्षक, विद्यार्थी आणि समाज यांच्यातील सुसंवादाने शिक्षण आनंददायी*

राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणात आपल्या राज्याने शिक्षणात मागील काही कालावधीपासून मोठी झेप घेतली असून प्रगतीकडे वाटचाल सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे पालकांचा व समाजाचा सरकारी शाळांबद्दल आत्मविश्वास वाढला आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनातून नवे प्रयोग विद्यार्थी करु लागले आहेत. शिक्षक, विद्यार्थी आणि समाज यांच्यातील सुसंवादानेg शिक्षण अधिक आनंददायी होऊ लागलं आहे, असे त्यांनी यावेळी सागितले.

*आदर्श शाळांची संख्या वाढवूया*

राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील काही उल्लेखनीय बाबींचा उल्लेख करतांना मुख्यमंत्र्यांनी जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद श्रीरामतांडा येथील शाळेमुळे १०० टक्के स्थलांतरण रोखल्याचे सांगतानाच पटसंख्येत वाढ झाली असे सांगितले. कोणत्याही सुट्टीविना शाळा ३६५ दिवस अविरत सुरु राहणारी चंद्रपूर जिल्ह्यातील पालडोह येथील जिल्हा परिषद शाळा, तोरणमाळ येथील जिल्हा परिषदेची शाळा आजूबाजूच्या २९ पाड्यावरील १६०० मुलांसाठीची आदर्श निवासी शाळा झाली आहे, असे असंख्य नाविन्यपूर्ण प्रयोग केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांचे कौतुक केले. आदर्श शाळा निर्माण करण्याचे खरे शिल्पकार शिक्षक असून अशा शाळांची संख्या वाढविण्यासाठी निर्धार करूया आणि उर्वरित सरकारी शाळांचा विकास करून त्यात भरीव पटसंख्या वाढवूया, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. 

*शिक्षकांची जागा कोणतंही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही*

ध्येयवादी आणि प्रयोगशील शिक्षकांची मोठी परंपरा या राज्याला लाभली असून या परंपरेमुळं इथली शिक्षण व्यवस्था अधिक समृद्ध झाली आहे. शिक्षकांची जागा कुणीही किंवा कोणतंही तंत्रज्ञान भरु शकत नाही इतकं महत्त्वाचं स्थान त्यांचं आहे, या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये चांगल वाईट शोधण्यासाठी शिक्षकांनी अधिक सजगपणे प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. शाळाबाह्य मुलांच्या समस्या, मध्यान्ह भोजन व व्यक्तिगत लाभाच्या इतर योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतील त्रुटी शोधून त्यांच्या सुलभतेनं अंमलबजावणीवर विशेष लक्ष केंद्रीत करतानाच शिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड ठरतील असे महत्त्वाचे विषय, उपक्रमांना प्राधान्य दिल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.   

*कोरोनाकाळातील आव्हानाचं संधीत रुपांतर* 

आई-वडीलांबरोबरच शिक्षकांचाही प्रत्येकाच्या जीवनात मोठा वाटा असतो. हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मधील शिक्षणाचा आणि शिक्षक रघुनाथ परब यांच्याविषयीची आठवण सांगितली. कोरोनाकाळातील आव्हानाचं संधीत रुपांतर करुन राज्यात अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

*शिक्षकांचे वेतन खात्यात वेळेवर जमा व्हावे*

शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यात वेळेवर जमा होतील यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना विभागाला देतानाच केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा लवकरच भरल्या जातील त्याचबरोबर शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच आयोजित केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांनी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते बीड जिल्ह्यातील श्री. सोमनाथ वाळके व श्री. शशिकांत कुलथे या दोन शिक्षकांचे मुख्यममंत्र्यांनी अभिनंदन केले. यावेळी शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भिवंडी, सिंधुदूर्ग, पुणे, सोलापूर, नाशिक, नंदूरबार, औरंगाबाद, हिंगोली, अमरावती, नागपूर, गडचिरोली, वाशीम, उस्मानाबाद, वर्धा, येथील शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी श्री. देओल यांनी आभार मानले.