शिक्षक मतदार संघ निवडणूक
निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज**
नागपूर, दि.29: विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी रविवारी विभागातील सर्व सहा जिल्ह्यांमध्ये मतदान पथके रवाना झाली आहेत. संबंधित प्रशासन तसेच पोलीस यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. एकूण २२ उमेदवार निवडणूक लढवित असून गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर नागपूरसह अन्य पाच जिल्ह्यांमध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी २९ डिसेंबर २०२२ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. ५ जानेवारी २०२३ रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होऊन नामनिर्देशन पत्र भरण्यास प्रारंभ झाला. ६ जिल्ह्यातील एकूण २२ उमेदवार ही निवडणूक लढवित आहेत.
सोमवारी ३० जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी आज त्या-त्या जिल्ह्यांच्या मुख्यालयातून मतदान पथके रवाना झाली आहेत. नागपूर जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत अजनी येथील सामुदायिक भवनातून दुपारी १२.२५ वाजता ४३ मतदान पथके रवाना झाली. सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वाजेदरम्यान भंडारा जिल्ह्यात १२,गोंदिया जिल्ह्यात १०,वर्धा जिल्ह्यात १४, चंद्रपूर जिल्ह्यात २७ आणि गडचिरोली जिल्ह्यात १८ मतदान पथके रवाना झाली.
*असे आहेत उमेदवार* नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सहा जिल्ह्यातील २२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. यात सतिश जगताप (महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष), प्रा.दीपकुमार खोब्रागडे (वंचित बहुजन आघाडी पक्ष), डॉ. देवेंद्र वानखडे (आमआदमी पक्ष), राजेंद्र झाडे (समाजवादी पक्ष (युनायटेड)), अजय भोयर (अपक्ष), सुधाकर अडबाले (अपक्ष), सतिश इटकेलवार (अपक्ष), बाबाराव उरकुडे (अपक्ष), नागो गाणार (अपक्ष), रामराव चव्हाण (अपक्ष), रविंद्रदादा डोंगरदेव (अपक्ष), नरेश पिल्ले (विश्व हिंदू जनसत्ता बहुमत पक्ष), निमा रंगारी (बहुजन समाज पक्ष), नरेंद्र पिपरे (अपक्ष), प्रा. प्रवीण गिरडकर (अपक्ष), इंजि. प्रो. सुषमा भड (अपक्ष), राजेंद्र बागडे (अपक्ष), डॉ. विनोद राऊत (अपक्ष), उत्तमप्रकाश शहारे (अपक्ष), श्रीधर साळवे (अपक्ष), प्रा. सचिन काळबांडे (अपक्ष) आणि संजय रंगारी(अपक्ष) यांचा समावेश आहे.
*124 केंद्रांवर होणार मतदान*
विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नागपूर विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये 124 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यात 43 मतदान केंद्र, वर्धा जिल्ह्यात 14, भंडारा जिल्ह्यात 12, गोंदिया जिल्ह्यात 10, चंद्रपूर जिल्ह्यात 27 तर गडचिरोली जिल्ह्यात 18 मतदान केंद्र आहे. *नागपूर जिल्ह्यात ४३ मतदान केंद्र*
नागपूर जिल्ह्यात विधानपरिषद शिक्षक मतदान केंद्राची एकूण संख्या ४३ आहे. यात भारशिंगी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत, मोवाड येथे लोकसत्ता रोटरी प्राथमिक शाळा नगर परिषद शाळा, नरखेड येथे पंचायत समिती इमारत, केळवद येथे भीमराव बापू देशमुख आदर्श विद्यालय, रामटेक येथे तहसील कार्यालय, पवनी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पारशिवनी येथे तहसिल कार्यालयाची इमारत, खापा येथे नगरपरिषद इमारत, सावनेर येथे नगर परिषद सुभाष प्राथमिक शाळा, मोहपा येथे नगर परिषद कार्यालयाची इमारत, काटोल येथे तहसिल कार्यालय, कोंढाळी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कळमेश्वर येथे तहसिल कार्यालय, खापरखेडा येथे दयानंद अँग्लो वैदिक प्राथमिक शाळा, कोराडी येथे विद्या मंदीर ज्युनियर कॉलेज, कामठी येथे तहसिल कार्यालय इमारत, कन्हान येथे नगर परिषद बचतभवन इमारत, मौदा येथे तहसिल कार्यालय इमारत, कोदामेढी येथे जिल्हा परिषद शाळा व ज्युनियर कॉलेज, नागपूर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक ८६ या मतदान केंद्रासाठी सिव्हील लाईन येथील नागपूर महानगरपालिकेची इमारत, प्रभाग क्रमांक ८४ साठी म.न.पा.हिंदी प्राथमिक शाळा गांधीनगर, प्रभाग क्रमांक १९ साठी पोलिस लाईन टाकळी म.न.पा. प्राथमिक शाळा, मेकोसाबाग येथे कामठीरोडवरिल नागसेन विद्यालय इमारत, प्रभाग क्रमांक ७१ साठी श्रीमती तुलसीदेवी रामरतन सारडा इंग्लिश प्राथमिक शाळा लकडगंज, प्रभाग क्रमांक ३६ साठी न्यु नंदनवन येथील म.न.पा. मराठी प्राथमिक शाळा क्रमांक १, प्रभाग क्रमांक ९४ साठी इतवारी हायस्कुल इमारत (वेस्ट विंग), वार्ड क्रमांक ११६ साठी न्यु इंग्लिश शाळा महाल, प्रभाग क्रमांक ३८ साठी सक्करदरा येथील मोहता सायन्स कॉलेजचे खोली क्रमांक १ व खोली क्रमांक २ तसेच बिंझानी सिटी कॉलेजच्या पूर्व बाजूची खोली क्रमांक १० व खोली क्रमांक ११, प्रभाग क्रमांक १०३ साठी पंडीत बच्छराज व्यास विद्यालय, प्रभाग क्रमांक ८० साठी माऊंट कारमेल गर्ल्स हायस्कूल, प्रभाग क्रमांक ४६ साठी ज्युपिटर हायस्कूल सावरकर नगर चौक, हिंगणा येथे पंचायत समिती कार्यालय, नागपूर ग्रामीण साठी तहसिल कार्यालय (ग्रामीण) इमारत सिव्हील लाईन, बुटीबोरी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कुही येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मांडळ येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १, उमरेड येथे नगर परिषद कार्यालय, बेला येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिरसी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १, भिवापूर येथे तहसिल कार्यालय इमारत येथील खोली क्रमांक १ मध्ये मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
मतदारांची जिल्हानिहाय संख्या
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात एकूण ३९ हजार ४०६ मतदार आहेत. यात २२ हजार ७०४ पुरुष तर १६ हजार ७०२ महिला मतदारांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील शिक्षक मतदारांची एकूण संख्या 16 हजार 480 आहे. यात 9 हजार 256 महिला तर 7 हजार 224 पुरुष मतदार आहेत. वर्धा जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 4 हजार 894 असून यात 2 हजार 962 महिला तर 1 हजार 932 पुरुष मतदारांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यात एकूण 3 हजार 797 मतदार आहेत. यात 1 हजार 225 महिला तर 2 हजार 572 पुरुष मतदार आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकूण 3 हजार 881 मतदार असून यात 1 हजार 218 महिला तर 2 हजार 663 पुरुष मतदार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 7 हजार 571 मतदार आहेत. यात 2 हजार 684 महिला तर 4 हजार 887 पुरुष मतदार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण 3 हजार 211 मतदार असून यात 630 महिला आणि 2 हजार 581 पुरुष मतदार आहेत.
*शिक्षकांना नैमित्तिक रजा मंजूर*
या निवडणुकीत पात्र शिक्षक मतदान करू शकणार आहे. त्यासाठी 30 जानेवारी रोजी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना अनुज्ञ असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त ही रजा असणार आहे. उद्या फक्त ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे. त्याच शाळाना सुटी आहे. अन्य ठिकाणी नियमित शाळा सुरू असतील.शाळेच्या वेळा व ईतर संनियंत्रणाबाबत मुख्याध्यापक आपले स्तरावर निर्णय घेतील.
*मोबाईलला मज्जाव*
मतदारांनी मतदान करायला जाताना सोबत मोबाईल फोन, पेन, पेन कॅमेरा, अन्य कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट घेऊन जाऊ नये. कोणत्याही आक्षेपार्ह वस्तूंना आत मध्ये घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
*गडचिरोली जिल्ह्यात सकाळी 7 वाजता मतदान*
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.