info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  16 Feb 2023

राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा प्रारंभ


सांगली संघाची कोल्हापूरवर मात
नागपूर दि. 16 : कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचा प्रारंभ  क्रीडा ज्योत प्रज्वलित आणि ध्वजारोहण करून करण्यात आला. समर्थ स्टेडियम, चिटणीस पार्क येथे 15 ते 19 फेब्रुवारीदरम्यान राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचा थरार रंगणार आहे. राज्यभरातून 600 खेळाडू दाखल झालेत.
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व विदर्भ खो-खो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार मोहन मते, आ. प्रवीण दटके, आ. विकास कुंभारे, माजी आमदार अनिल सोले, माजी आ. गिरीष व्यास, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक राज्यस्तरीय विदर्भ  खो-खो असोसिएशनचे सचिव सुधीर निंबाळकर, मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
भाई नेरूळकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत एकूण 680 खेळाडू, मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक तसेच शंभर संघटनांचे प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेतील सर्वच खेळाडूंचा एक वर्षाचा प्रत्येकी दोन लक्ष रुपयांचा विमा काढण्यात आला आहे.
 एकूण सहा प्रकारचे प्राविण्यस्तर या स्पर्धेत असणार आहे. तर 23 लाख 26 हजार रुपयांची बक्षिसे या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना वाटप करण्यात येणार आहे. 
कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर शंभर विद्यार्थ्यांनी  एकत्र येत योगासने सादर केली. जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करीत स्पर्धेत सहभागी सर्वच खेळाडू, प्रशिक्षकांचे स्वागत केले. 
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी तर आभार विदर्भ खो-खो संघटनेचे सचिव सुधीर निंबाळकर यांनी मानले. उदघाटन सामना कोल्हापूर आणि सांगली या संघादरम्यान झाला असून सांगली संघ विजयी ठरला.